या मंत्र्याचे ठाण्यावरून मोठे वक्तव्य : सुशासनासाठी ‘ओन्ली कमळ’
-ठाणे महापालिका निवडणुकांचे रणशिंग
प्रतिनिधी
ठाणे : देशात एक काळ असा होता की जेव्हा ‘ओन्ली विमल’ ही जाहीरात सर्वत्र गाजत होती. आता देशात ‘ओन्ली कमळ’ हा एकमेव नारा सर्वत्र घूमत आहे. ठाणे शहरात भविष्यकाळात सुशासन हवे असेल, तुम्हाला २४ तास पाणी हवे असेल तर ठाण्यातही ‘ओन्ली कमळ’ हा नारा घुमायला हवा. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाने जर मला ठाण्याची जबाबदारी दिली तर ठाण्यात माझे ऐका. तुमच्या जगणे सुरळीत करण्याचा मी तुम्हाला शब्द देतो, अशा शब्दात वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी सायंकाळी ठाणे महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचा एक भाग असलेल्या कोपरी परिसरात भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नाईक उपस्थित होते. यावेळी कोपरी मंडळ भाजपच्या वतीने नाईक यांचा जाहीर सत्कारही करण्यात आला. यावेळी बोलताना नाईक यांनी ‘ठाणेकरांचे जगणे सुसह्य करायचे असेल तर आता ‘ओन्ली कमळ’ हाच ध्यास ठेवायला हवा’ असे आवाहन त्यांनी केले.
ही केवळ माझी भावना नाही, तर ठाण्याचे आमदार संजय केळकर, विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांचीही ही भावना आहे. जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनाही तसेच वाटत असेल. त्यामुळे ठाण्यात जर सुशासन हवे असेल तर ओन्ली कमळ ही भावना लोकांमध्ये रुजू द्या, असे आवाहन नाईक यांनी यावेळी केले. ठाणेकरांच्या हितासाठी झोकून काम करताना इतर कोणाचाही उल्लेख, टिका करायची गरज नाही, अशी टोलेबाजीही नाईक यांनी यावेळी केली.


