पुन्हा फाटलं : शिंदेसेना व राष्ट्रवादीत पालकमंत्रीपदाचा तिढा
-नाराजीनाट्य उफाळले
प्रतिनिधी
रायगड : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, रायगडच्या पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर नाराजीनाट्य सुरू झालं. मंत्री भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा देखील सुरू होती. त्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली. मात्र पूर्वी ज्यांच्या नावाची घोषणा पालकमंत्री म्हणून झाली आहे, तेच प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करतील असं ठरलं होतं. त्यामुळे आज आदिती तटकरे यांनी झेंडावंदन केलं. यावर बोलताना आता भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनीत तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले भरत गोगावले?
मंत्री म्हणून त्यांनी झेंडावंदन केलं, आम्ही त्याबद्दल काही बोलणार नाही. जर मी काही चुकीचं काम केलं असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर यावेळी बोलताना त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे, तटकरे यांचं नाव न घेता हल्लाबोल केला. जो भावाचा नाही झाला तो आमचा काय होणार, आव्हान स्किकारून चालतो तोच यशस्वी होतो. मंगळवारी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, काही गोष्टी या गनिमी काव्याच्या असतात, असं गोगावले यांनी म्हटलं आहे.


