ही शिवसेना ठरली वरचढ : म्हणाले, विधानसभेत सुफडा साफ करू

ही शिवसेना ठरली वरचढ : म्हणाले, विधानसभेत सुफडा साफ करू

-शिवसेना फुटीला दोन वर्ष पूर्ण

प्रतिनिधी
मुंबई : विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी १६ आमदारांसह सुरत गाठले आणि शिवसेना विधिमंडळ पक्षात उभी फूट पडली. त्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली. या दोन वर्षांत शिवसेनेच्या दोन गटांमध्ये परस्परांवर कुरघोडीचे अनेक प्रयत्न झाले. ठाकरे गटाचे नाव आणि चिन्हही गेले. पण निवडणुकीत ठाकरे गटाने शिंदे यांच्यावर मात करून आपलीच शिवसेना खरी हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला दोन वर्षे पूर्ण होत असताना पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण असताना, निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिले. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि मशाल हे नवीन चिन्ह मिळाले. लोकसभा निवडणूक प्रचारात असली आणि नकली शिवसेना हा वाद रंगला. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या पक्षाच्या दोन गटांची ताकद स्पष्ट झाली. शिवसेनेच्या शिंदे गटाचा स्ट्राइक रेट ठाकरे गटापेक्षा जास्त असला तरी ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते (१६.७२ टक्के) ही शिंदे गटापेक्षा (१२.९५ टक्के) जास्त आहेत. शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या ४२ आमदारांपैकी २० आमदारांच्या मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार पिछाडीवर आहेत. यामुळेच जनतेच्या न्यायालयाचा कौल आम्हाला मिळाल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.