इमोशनल पॉलिटिक्स : माझा भाऊ सणासुदीचा काळ लक्षात घेईल!
-अमृता फडणवीस यांचे मोठे भाष्य
प्रतिनिधी
मुंबई/ नागपूर : मराठा आरक्षणातील त्रुटी दूर करून प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आणला गेला आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं असून ते आता मुंबईला येण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, मुंबईत गणेशोत्सवाची धामधुमी सुरू असल्याने या आंदोलनामुळे मुंबईतील कायदा सुव्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी मुंबईत येऊ नये अशी मागणी केली जातेय. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मनोज जरांगे माझे भाऊ आहेत, त्यांनी मी जेवणाचं निमंत्रण देईन”, असं अमृता फडणवीस मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबत दोन दिवसांपूर्वी बोलल्या होत्या. त्यांच्या या निमंत्रणावर मनोज जरांगे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. “मी भाऊबीजेला त्यांच्याकडे जाईन”, असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं होतं.
तसंच आता मनोज जरांगे मुंबईत येण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, सणासुदीच्या काळात मुंबईत आंदोलन झालं तर कायदा सुव्यवस्था विस्कळीत होईल. याबाबत आज अमृता फडणवीसांना विचारलं गेलं. त्यावर त्या म्हणाल्या, “मला विश्वास आहे की माझे भाऊ हे सणा-सुदीचा काळ लक्षात घेऊन जे करायचं आहे ते शांततापूर्वकच करतील.
मराठा आरक्षणाचा हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. याबात काही तोडगा निघू शकेल का, याबाबत राज्य सरकार उत्तर शोधत आहेत”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.
१२ सप्टेंबर रोजी मुंबई येण्याबाबत समर्थकांची बैठक होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनास परवानगी मागितली असून सरकार ती देईल, असे जरांगे यांनी म्हटले आहे. ‘नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही’, अशी टीका करत जरांगे यांनी आंदोलकांची पावले मुंबईच्या दिशेने असल्याचे स्पष्ट केले.
जरांगे यांच्या आंदोलनाला मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून पाठिंबा वाढत असून लातूर तालुक्यातील चिंचोलीराव वाडी परिसरातील लातूर-बार्शी मार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निलंगा तालुक्यातील निटूर येथे लातूर-जहीराबाद महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. एका बाजूला आंदोलनाला पाठिंबा देणारी मंडळी रस्त्यावर येत असताना, सरकारकडून कोणत्या जिल्ह्यातून किती प्रमाणपत्रे दिली गेली, याचा गोषवारा देण्यास सुरुवात केली आहे.


