यूपी निवडणूक : काँग्रेसचे काय आहे ‘बीएम’समीकरण?
-ओबीसी, दलित समाजालाही दिले प्रतिनिधित्व
प्रतिनिधी
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने बाकी असताना काँग्रेसने राज्यात मोठे संघटनात्मक फेरबदल केले आहेत. पक्षाने प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्षपदाची नावे जाहीर करत ‘ब्राह्मण आणि मुस्लिम’ समीकरणाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आमदार आराधना मिश्रा मोना यांची उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्याच वेळी सहारणपूरचे खासदार इमरान मसूद यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या नव्या नेतृत्वरचनेत ब्राह्मण आणि मुस्लिम चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यासोबतच ओबीसी आणि दलित समाजालाही संघटनेत प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
आराधना मिश्रा ‘मोना’ या उत्तर प्रदेशातील रामपूर खास मतदारसंघाच्या तीन वेळा आमदार राहिल्या आहेत. त्या राज्यातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या होत्या. राज्यसभा खासदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांच्या त्या कन्या आहेत. त्यांनी उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांची जागा घेतली आहे. ऑगस्ट २०२३ पासून अजय राय हे प्रदेशाध्यक्ष होते.
आराधना मिश्रा यांच्या जागी चौधरी वीरेंद्र सिंह यांची उत्तर प्रदेश काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय देविंदर निषाद आणि आलोक प्रसाद यांची पक्षाच्या राज्य युनिटच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नव्या संघटनात्मक रचनेत विविध समाजातील नेत्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न दिसून येतो.
ब्राह्मण समाजातील आराधना मिश्रा, मुस्लिम समाजातील इमरान मसूद, तर ओबीसी समाजातील देविंदर निषाद आणि दलित समाजातील प्रसाद असे संतुलित सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. काँग्रेसची ही रचना ‘इंडिया’ आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या ‘पीडीए’ म्हणजेच पिछडा, दलित आणि अल्पसंख्याक या सामाजिक समीकरणाशी मिळतीजुळती आहे.
दरम्यान, राज्याचे मावळते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी ‘एक्स’वर पोस्ट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने एका सामान्य कार्यकर्त्यावर उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्याबद्दल आपण आयुष्यभर कृतज्ञ राहू, असे त्यांनी म्हटले. मात्र, पक्षाची लढाई अजून संपलेली नाही, असे नमूद करीत ते पुढे म्हणाले की, ‘नवनियुक्त प्रदेशाध्यक्षांसह पक्षाच्या सर्व नव्या पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा! आपण लढू, आपण जिंकू!’


