मुख्यमंत्री स्पष्टचं बोलले : अन्यथा माझा राजीनामा समजा
-सार्वजनिक कार्यक्रमात सूचक विधान
प्रतिनिधी
जम्मू- काश्मीर : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात सूचक विधान केले. भाजपाबरोबर हातमिळवणी करून सरकार चालवण्यापेक्षा मी राजीनामा देणेचे पसंत करेन, असे अब्दुल्ला म्हणाले. भाजपाला काश्मीर सरकारमध्ये सामावून घेतले असते, तर परतफेड म्हणून आपल्याला त्वरित राज्याचा दर्जा मिळाला असता, पण ही तडजोड करण्यास तुम्ही तयार आहात का? माझी भाजपाबरोबर हातमिळवणी करण्याची माझी मुळीच इच्छा नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ओमर अब्दुल्ला यांच्या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. काश्मीरमधील सत्ताधारी पक्षात फूट पडून सरकार तर धोक्यात येणार नाही ना? असे कयास अनेकजण बांधत आहेत.
ऑगस्ट २०१९ मध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले होते. त्यानंतर तेथील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. तब्बल १० वर्षांनी झालेल्या या निवडणुकीत ओमर अब्दुला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने ४८ जागांवर विजय मिळवला; तर भाजपाला केवळ २९ जागांवरच समाधान मानावे लागले. त्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सध्या काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीचे बहुमतात सरकार आहे. मात्र, या सरकारमधील काही आमदारांमध्ये धुसफूस असल्याची चर्चा आहे. काही आमदार हे भाजपाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.
मंगळवारी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दक्षिण काश्मीरमधील एका जाहीर सभेत बोलताना सरकारमधील आमदारांना उद्देशून सूचक विधान केले. “भाजपाला राज्यातील सत्तेत सामावून घेतले, तर काश्मीरला पुन्हा विशेष राज्याचा दर्जा मिळेल, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. तुम्ही ही तडजोड करण्यास तयार आहे का हे मला सांगा. कारण- भाजपाबरोबर जाण्याची माझी अजिबात इच्छा नाही. राज्याला दर्जा मिळवण्यासाठी जर तसे करावे लागत असेल, तर मी राजीनामा देणे पसंत करीन. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही आमदाराला मुख्यमंत्री करून भाजपाबरोबर नवीन सरकार स्थापन करा. जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळेपर्यंत मी वाट पाहण्यास तयार आहे,” असे ओमर अब्दुल्ला यांनी जाहीर सभेत सांगितले.


