भाजपाच्या सुमार कामगिरीचे विश्लेषण : अजित पवार नकोय
-म्हटले, कार्यकर्ता खचलेला नाही, तर संभ्रमात
प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामधील संबंध दुरावल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचे कान टोचल्यानंतर संघाशी संबंधित मासिकांनीही भाजपाच्या सुमार कामगिरीचे विश्लेषण करताना पक्षावर बरीच बोचरी टीका केली आहे. संघाचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या ‘ऑर्गनायझर’मध्ये याआधीही भाजपाच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले होते. त्यानंतर आता ‘विवेक’ या संघाशी संबंधित साप्ताहिकानेही भाजपाच्या महाराष्ट्रातील सुमार कामगिरीचे विश्लेषण करताना अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच्या युतीवर खापर फोडले आहे. त्याबरोबरच पक्ष, कार्यकर्ते आणि राज्यातील महायुती सरकारमध्ये सुसंवाद नसल्यामुळे हा निकाल पहायला मिळाला असल्याची टीकाही विवेक साप्ताहिकाने केली आहे. ‘कार्यकर्ता खचलेला नाही, तर संभ्रमात!’ असे या लेखाचे नाव आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना वा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून. राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट आहे. याची जाणीव भाजपा नेत्यांना नाही असे नाही.”
महाराष्ट्रामध्ये भाजपाने अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेबरोबर लोकसभेची निवडणूक लढवली. महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने लढवलेल्या एकूण १५ जागांपैकी फक्त ७ जागांवर विजय मिळवला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तेव्हाच्या शिवसेनेने (एकसंध) २३ जागा जिंकल्या होत्या. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने लढवलेल्या ४ जागांपैकी फक्त एका जागेवर विजय मिळवता आलेला आहे.
शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असल्याने भाजपाने शिवसेनेबरोबर युती करणे नैसर्गिक आहे, असेही मत ‘विवेक’मधील लेखामध्ये मांडण्यात आले आहे. “शिवसेनेने पुन्हा युतीत येणे, त्यासाठी शिवसेनेत घडलेले अंतर्गत बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या. हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्याने आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्याने बारीकसारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचे मतदारांना पटले होते. मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसर्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचे चित्र आहे. अर्थात राजकीय नेत्यांची वा पक्षाची स्वतःची अशी काही गणिते व आडाखे असतात. निवडणुकीच्या राजकारणाचे आकलन वेगळे असते; परंतु जर ही गणिते चुकताना दिसत असतील तर त्याचे काय करायचे, हा प्रश्न उपस्थित होतोच. तसेच, कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश हे वरकरणी मुख्य कारण दिसत असले तरी तेवढेच एक मुख्य कारण आहे असे मुळीच नाही. ते केवळ हिमनगाचे टोक आहे.”


