या राज्यात राजकीय पेच : मुख्यमंत्री बनविण्यासाठी घडामोडी
-इंडिया टुडेनी दिले वृत्त
प्रतिनिधी
कर्नाटक : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदावरून नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे काँग्रेससमोर एक नवं संकट उभं ठाकलं आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना मानणाऱ्या काँग्रेसमधील एका गटाने काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेत डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केल्याची चर्चा आहे.
खरं तर ही मागणी २०२३ मध्ये झालेल्या सत्ता-वाटप करारावर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या वादावर काँग्रेस हायकमांड काय भूमिका घेतं? याकडे जनतेचं लक्ष लागलेलं आहे. असं असताना आता उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी एका सरकारी कार्यक्रमात बोलताना एक मोठं भाष्य करत थेट सिद्धरामय्यांना सूचक इशारा दिला आहे. डीके शिवकुमार यांनी सोनिया गांधी यांच्या राजकीय त्यागाचा उल्लेख करत सिद्धरामय्या यांना अप्रत्यक्ष संदेश दिला आहे.
डी.के. शिवकुमार यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचं कौतुक करीत त्यांच्या राजकीय त्यागाचा उल्लेख केला. डी.के. शिवकुमार म्हणाले की, “सोनिया गांधी यांनी सत्तेचा त्याग केला. त्या काळात (२००४) माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना सोनिया गांधी पंतप्रधान व्हाव्यात असं वाटत होतं. पण त्यांनी मनमोहन सिंग यांचं नाव सुचवलं होतं”, असं डी.के. शिवकुमार यांनी म्हटलं. दरम्यान, डी.के. शिवकुमार यांनी जेव्हा हे वक्तव्य केलं, तेव्हा त्या व्यासपीठावर सिद्धरामय्या देखील उपस्थित होते, त्यामुळे डी.के. शिवकुमार यांचा हा अप्रत्यक्ष संदेश सिद्धरामय्या यांना असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.


