या राज्यात काँग्रेससमोर नवे संकट; डझनभर मंत्र्यांचे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल
-डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा
प्रतिनिधी
कर्नाटक : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदावरून नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे बिहार निवडणुकीतील पराभवानंतर आता काँग्रेससमोर नवे संकट उभे ठाकले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना मानणारा काँग्रेसमधील एक गट गुरुवारी नवी दिल्लीत दाखल झाला आहे. डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा, अशी विनंती त्यांच्याकडून केली जात आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, किमान १५ आमदार आणि अनेक विधानपरिषद सदस्यांनी डी.के. शिवकुमार यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्याची विनंती करण्यासाठी नवी दिल्लीत तळ ठोकला आहे. ही मागणी २०२३ मध्ये झालेल्या सत्ता-वाटप करारावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. नेमका हा वाद काय? काँग्रेस नेत्यांची या वादावर भूमिका काय? त्याविषयी जाणून घेऊयात…
२०२३ मध्ये झालेल्या सत्तावाटप कराराचा भाग
डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी २०२३ मध्ये झालेल्या सत्ता-वाटप करारावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. याअंतर्गत सिद्धरामय्या यांना अडीच वर्षांचा कार्यकाळ (२० नोव्हेंबरपर्यंत) पूर्ण केल्यानंतर शिवकुमार यांना मुख्यमंत्री पद सोपवायचे होते. परंतु, काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या मुख्यमंत्री बदलावर अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही.
गुरुवारी दिल्लीत पोहोचलेल्या मंत्र्यांमध्ये मंत्री एन. चलुवरायस्वामी आणि आमदार इक्बाल हुसेन, एच.सी. बालकृष्ण आणि एस.आर. श्रीनिवास यांचा समावेश आहे. यापूर्वी मंगळवारी, आमदार रवी गनिगा, गुब्बी वासू, दिनेश गूलीगौडा आणि इतरांनी पक्षाच्या नेतृत्वाकडे हा मुद्दा मांडण्यासाठी आधीच दिल्ली गाठली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आमदार अनेकल शिवन्ना, नेलमंगला श्रीनिवास, कुनिगल रंगनाथ, शिवगंगा बसवराज आणि बालकृष्ण हेदेखील दिल्लीत पोहोचणार आहेत.
मुख्यमंत्रिपदी सिद्धरामय्या यांनी अडीच वर्षे पूर्ण केल्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवकुमार यांच्या समर्थकांकडून ही मागणी जोर धरू लागली आहे. मे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर, मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात तीव्र स्पर्धा होती. सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्री आणि शिवकुमार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली असली तरी, अडीच वर्षांनंतर शिवकुमार सूत्रे हाती घेतील या ‘रोटेशनल फॉर्म्युला’बद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होती.
या वादावर सिद्धरामय्या यांची प्रतिक्रिया
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की, त्यांचा आपल्या पदावर कायम राहण्याचा आणि भविष्यातही राज्याचे अर्थसंकल्प सादर करण्याचा मानस आहे. पुढील दोन वर्षे अर्थसंकल्प तुम्ही सादर करणार का, या प्रश्नावर सिद्धरामय्या प्रतिप्रश्न करत म्हणाले, “तुम्ही असे का विचारत आहात? होय, मी पुढेही मुख्यमंत्री राहीन आणि पुढील अर्थसंकल्पही सादर करेन.” मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोडला असल्याचे सांगितले. कृषीमंत्री एन. चलुवरायस्वामी यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल सिद्धरामय्या म्हणाले, “ते तिथे गेले आहेत की नाही हे मला माहीत नाही. डी.के. शिवकुमार यांनी आधीच सांगितले आहे. मी आणखी काय सांगू?” ते पुढे म्हणाले, “माझे चलुवरायस्वामी यांच्याशी बोलणे झाले. आजसुद्धा मी त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोललो. त्यांनी सांगितले की ते केंद्रीय कृषीमंत्र्यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले आहेत.”
डी.के. शिवकुमार काय म्हणाले?
आमदारांच्या अचानक दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना शिवकुमार म्हणाले, “मला याबद्दल माहिती नाही, माझी तब्येत ठीक नाही.” सिद्धरामय्या यांनी त्यांच्या पूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळावर जोर दिल्याचे विचारले असता, शिवकुमार यांनी उत्तर दिले, “मला याचा खूप आनंद आहे. आमच्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली आहे. आम्ही सर्वजण एकत्र काम करत आहोत.” त्यांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेबद्दलच्या चर्चा फेटाळून लावल्या.


