या माजी मंत्र्यांच्या प्रश्नाने गेला शहर आरटीओ किरण बिडकर यांचा राजकीय बळी

या माजी मंत्र्यांच्या प्रश्नाने गेला शहर आरटीओ किरण बिडकर यांचा राजकीय बळी

-मानकापूर अपघाताचे विधानसभेत तीव्र पडसाद

गजानन ढाकुलकर ( थेट विधानसभेतून)
नागपूर : मानकापूर उड्डाणपुलावर सप्टेंबर महिन्यात स्कूल बस आणि स्कूल व्हॅनमध्ये झालेल्या भीषण अपघातात चालक आणि एका १४ वर्षीय विद्यार्थिनीसह दोन जणांचा मृत्यू झाला होता. या गंभीर घटनेचे पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आरटीओ अधिकारी किरण बिडकर यांच्या निलंबनाची घोषणा केली.

याविषयी काँग्रेसचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती.
नागपूर ग्रामीण आणि पूर्व आरटीओचीही चौकशी करण्याचे निर्देश दिले. १२ सप्टेंबर रोजी मानकापूर उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात व्हॅन चालकाचा जागीच मृत्यू झाला तर सान्वी खोब्रागडे या विद्यार्थिनीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. व्हॅनमध्ये तिच्या भावासह एकूण सात मुले जखमी झाली होती. तपासामध्ये अपघातास कारणीभूत असलेल्या बसकडे २०२१ पासून फिटनेस प्रमाणपत्र (योग्यता प्रमाणपत्र) नव्हते, हे उघड झाले. नितीन राऊत यांनी सभागृहाला माहिती दिली की, नागपुरातील ३,९९३ नोंदणीकृत स्कूल बस आणि व्हॅनपैकी ८ ते १० टक्के वाहनांकडे अद्यापही योग्यता प्रमाणपत्र नाही. या चर्चेदरम्यान आमदार प्रवीण दटके यांनी केवळ स्कूल व्हॅनच नव्हे, तर मध्यप्रदेशातील अवैध खासगी बसेसची वाहतूक शहरात सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर केवळ बसेसवर नव्हे, तर अधिका-यांवरही कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली.

सुधीर मुनगंटीवार यांची टीका

भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिका-यांवर थेट टीका केली. वाहनांवरील कारवाईमुळे केवळ अधिकाऱ्यांचे रेट वाढत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. केवळ वाहनांवर नव्हे तर अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली. त्यांच्या मागणीची आणि सभागृहातील सदस्यांच्या भावना लक्षा घेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने कठोर कारवाईची घोषणा केली.

शहरात धावताहेत ८३७ स्कूल अनफिट वाहने

मंत्री सरनाईक यांनी नागपूर शहरातील अवैधरित्या वाहतूक करणा-या २४८ वाहनांवर कारवाई करून ८३ लाख ६ हजार रुपयांचा दंड आकारल्याची माहिती दिली. तसेच, शहरात ८३७ वाहनांकडे फिटनेस प्रमाणपत्र नसल्याची कबुलीही त्यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी टाटा कंपनीकडून १३ विद्यार्थी आणि १ चालक अशा १४ आसन क्षमतेची स्कूल व्हॅन तयार केली. या व्हॅनमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षात्मक उपाय करण्यात आले आहे. व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून ही व्हॅन चालक दारु प्यायला असेल तर सुरूच होणार नाही. असे स्मार्ट फिचर यात टाकण्यात आले आहे.
मंत्री सरनाईक यांनी या व्हॅनला शासनाने अधिकृत स्कूल व्हॅन म्हणून परवानगी दिली असल्याचे सांगितले.

हे सर्व अनधिकृत

स्कूल बस तसेच व्हॅन यासह ऑटोतूनही विद्यार्थ्यांची वाहतूक होते. परंतु, हे सर्व अनधिकृत आहेत. शाळा मालकीच्या बसेस देखील बसेस ‘अधिकृत’ म्हणता येणार नाही, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. शासनाने टाटाच्या व्हॅनला अधिकृत केले असून अनेक शाळांनी ज्यांचे जुने वाहन बंद करून हे नवे वाहन खरेदी केल्याचे सांगितले.