मोठे नियोजन : या निवडणुकीसाठी राहुल गांधी मैदानात
-दिल्लीतही बैठकांचे सत्र
प्रतिनिधी
केरळ : केरळ विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजून एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. केरळमध्ये २०२६ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणूक पाहता काँग्रेसनेही आतापासून मोठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. खासदार प्रियांका गांधी या देखील सातत्याने केरळ दौऱ्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील २८ फेब्रुवारीला महत्वाची बैठक बोलावली. ही बैठक दिल्लीत होत असून या बैठकीत केरळ विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषगांने चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या बैठकीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर हेही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शशी थरूर हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. काही दिवसांपूर्वी शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचं तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्याबरोबर त्यांनी सेल्फीही काढला होता. तसेच काँग्रेसने आपल्या नीतीमध्ये बदल करत मतपेटीच्या बाहेरचा विचार करून नव्या मतदारांना आकर्षित केले पाहिजे, असंही शशी थरूर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शशी थरूर हे काँग्रेस सोडून भाजपात जाणार का? याबाबत राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. मात्र, या चर्चांनंतर आज काँग्रेसच्या बैठकीला खासदार शशी थरूर उपस्थित राहणार असल्यामुळे अनेकांचं लक्ष या बैठकीकडे लागलं आहे.
केरळच्या आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ता आणण्यासाठी काँग्रेसने मोठी तयारी सुरु केली आहे. या अनुषंगाने आज होत असलेल्या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, पक्षाचे प्रभारी, प्रदेश काँग्रेसचे प्रमुख, विधिमंडळ पक्षाचे नेते, खासदार आणि इतर ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे हे केरळ काँग्रेसच्या नेत्यांकडून पक्षाचा आढावा घेण्याची शक्यता आहे.


