प्रचार शिगेला : राज्यात मुख्यमंत्री फडणविसांच्या होणार इतक्या सभा!
-ग्राउंड रूट प्रचारामुळे शिंदेसेनेत अस्वस्थता
प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी ठिकठिकाणी सभा घेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रचारसभांचा धडाका लावला आहे. बुधवारी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अकोला जिल्ह्यातील हिवरखेडा येथे जाहीर सभा घेतली. अयोध्येतील श्रीराम मंदिरानंतर आता हिवरखेड नगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे, असे फडणवीसांनी या सभेतून सांगितले. त्यानंतर लगेच अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी आपला सूर बदलला आणि परिसरातील आरोग्य उपकेंद्राचे १०० खाटांच्या रुग्णालयात रूपांतर करण्याचे आश्वासन दिले. त्यादरम्यान फडणवीसांनी प्रचारात आघाडी घेतल्याने विरोधकांसह शिवसेना शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण आली आहे.
–भाजपाचा प्रचार नेमका कसा ?
२०१४ पासून भारतीय जनता पक्षाने हिंदुत्व आणि विकास या दोन मुद्द्यांवरून विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याच मुद्द्यांना पुढे रेटून मुख्यमंत्री फडणवीसांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. येत्या २ डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ३ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने १३२ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला होता. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाला राज्यात कुबड्यांची (मित्रपक्षांची) गरज नसून पक्ष स्वबळावर निवडणुका लढवण्यास सक्षम असल्याचे म्हटले होते. त्याच्या या वक्तव्यानंतर राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकांकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे.
-लोकसभा आणि विधानसभांसारखाच प्रचार
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांप्रमाणेच भाजपाचे नेते निवडणुकांनाही तितक्याच तयारीने सामोरे जात आहेत. त्याच वेळी महाआघाडीत शिवसेना शिंदे गटाबरोबर सुरू असलेल्या मतभेदांनाही पक्षाला तोंड द्यावे लागत आहे. या निवडणुकीत भाजपाचे उद्दिष्ट संपूर्ण वर्चस्व मिळविण्याचे असल्याने फडणवीस दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये चार ते पाच जाहीर सभा घेत आहेत. बुधवारी पालघरमध्ये विविध ठिकाणी घेतलेल्या सभांमध्ये त्यांनी स्थानिकांसाठी १० लाख रोजगार निर्माण करण्याचे आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्याचे आश्वासन दिले. डहाणूमध्ये मुख्यमंत्र्यांनी निसर्गरम्यतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशातील पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आश्वासनही दिले.
–देवेंद्र फडणवीस यांचा सभांचा धडाका
पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या अखेरीस फडणवीस २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठी ३० हून अधिक सभा घेतील, असे भाजपातील एका नेत्याने सांगितले आहे. “भारतीय जनता पक्षासाठी प्रत्येक निवडणूक महत्त्वाची आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाकडून कोणताही भेदभाव केला जात नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रचार करणे यात चुकीचे काय आहे? ते कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान आहेत. होय, आम्हाला लोकांची सेवा करण्यासाठी आणि राज्यात विकासाच्या माध्यमातून परिवर्तन आणण्यासाठी सत्ता हवी आहे. काँग्रेस आणि इतर पक्षातील नेते स्वत:च्या इच्छेने भाजपात आले आहेत”, असे भाजपाचे नेते ज्येष्ठ नेते श्रीकांत भारतीय म्हणाले.
–भाजपाकडून सत्तेचा दुरुपयोग
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे १०० हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. विरोधकांनी याच मुद्द्याला हाताशी धरून मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपावर दबावतंत्रांचा आरोप केला आहे. भाजपाचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमार्फत विरोधकांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही भाजपावर सत्तेच्या दुरुपयोगाचा आरोप केला आहे. त्याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही भाजपावर टीकेची झोड उठवली आहे.
–भाजपाच्या प्रचारामुळे शिंदे गटात अस्वस्थता
भाजपाच्या आक्रमक प्रचारामुळे फक्त विरोधकच नव्हे, तर महायुतीतील मित्रपक्षांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिंदे गटाचा पारंपरिक गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात भाजपाच्या घुसखोरीवर नाराजी व्यक्त होत आहे. कल्याण-डोंबिवलीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केल्याने शिंदे गटातील संतापले आहेत. विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलेला पक्ष स्थानिक निवडणुकीला इतक्या आक्रमकपणे प्रचार का करीत आहे, असा प्रश्न शिंदे गटातील एका नेत्याने उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंनी राज्यात आपला निवडणुकीचा प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेला आपल्यासमोरील आव्हानाची जाणीव ठेवावी लागेल, असेही या नेत्याने सांगितले आहे.
–काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
महायुती सरकारमधील मंत्री व भाजपाच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विरोधकांकडे ना नेते उरले ना कोणताही अजेंडा, म्हणून ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा प्रचाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. निवडणुकांवर लक्ष केंद्रित न करता, काँग्रेसच्या नेत्यांकडून फक्त मतचोरी आणि ईव्हीएमबाबत निराधार आरोप केला जात आहे. दरम्यान, नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निकालानंतर दुसऱ्या टप्प्यात ३२ जिल्हा परिषदांची निवडणूक होणार आहे; तर तिसऱ्या टप्प्यात मुंबई महापालिकेसह २९ पालिकांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोणता पक्ष बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


