पुन्हा डोक्यावर हात; नागपुरात येणारा मोठा उद्योग गुजरातकडे
-विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप
गजानन ढाकुलकर
नागपूर : राज्यातील एकामागून एक प्रकल्प गुजरातला जात आहे. महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पाअंतर्गत अठरा हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती पुढे आली आहे. असे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
वडेट्टीवार एक्स पोस्टद्वारे म्हणतात, वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे.हिंदू – मुस्लिम, जीभ कापा- जीभेला चटके द्या, पक्ष फोडा- आमदार पळवा सतत असे निरर्थक उद्योग करणारे महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, अधिकारी हे मंत्र्यांना खुश करण्यात व्यस्त आहे. मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे आणि राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.


