देवाभाऊ तू पुढे चल… उपराजधानीत जोरदार स्वागत
-कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला.
प्रतिनिधी
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रविवारी दुपारी १२ वाजतानंतर नागपुरात आगमन झाले. त्यांच्या प्रथम नगरागमनानिमित्त नागपूरकर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. “विजेता तू देवाभाऊ…. पुढे चल” हे गाणे त्यांच्या स्वागतानिमित्त वाजवले जात होते व ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांचे १२ तारखेला प्रथम नागपुरात आगमन होणार होते. त्यानिमित्त कार्यककर्त्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली होती. पण तो मुहूर्त टळला. नंतर ते १३ डिसेंबरला येणार असे जाहीर करण्यात आले. पण ही तारीखही चुकली. अखेर १५ डिसेंबरचा मुहूर्त ठरला आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला. विमानतळ ते त्यांचे धरमपेठमधील निवासस्थान असा मिरवणुकीचा मार्ग ठरला. हजारो कार्यकर्ते रविवारी विमानतळावर जमले होते.


