ठरले हे कारण! दत्ता मेघेंचे कट्टर समर्थक शिंदेंच्या शिवसेनेत
-लोकांची कामे करण्यासाठी शिंदे गटात प्रवेश
प्रतिनिधी
नागपूर : भाजप नेते, माजी मंत्री दत्ता मेघे यांचे कट्टर समर्थक, माजी महापौर रघुनाथ मालीकर, माजी नगरसेविका पुष्पा मालीकर यांच्यासह इतरही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना नेते व राज्यमंत्री आशीष जयस्वाल याच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून रघुनाथ मालीकर दत्ता मेघे यांच्यासोबत होते. महापालिकेत काँग्रेस -राष्ट्रवादीची सत्ता असताना मालीकर राष्ट्रवादीच्या कोट्यातून उपमहापौर झाले होते. त्यांच्या पत्नी पुष्पा मालीकरही राष्ट्रवादीच्या नगरसेविका होत्या. दत्ता मेघे यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतरही ते मेघे यांच्यासोबत होते. त्यानंतर मेघे भाजपमध्ये गेले. पण मालीकर भाजपमध्ये गेले नव्हते. मात्र ते मेघे यांच्याच सोबत होते.
आज त्यांनी रविभवनमध्ये सेना नेते आशीष जयस्वाल यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. लोकांची कामे करण्यासाठी शिंदे गटात प्रवेश केल्याचे मालीकर यांनी सांगितले. रविभवनमध्ये झालेल्या प्रक्षप्रवेश कार्यक्रमात मालिकर यांच्यासह ,राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका पुष्पा मालिकर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी, नगरसेवक दिलीप मडावी,विठ्ठल हेडाऊ,, विकास नागभिडे, मनसेचे मोरेश्वर धोटे,योगेश गोंडाणे, परसाराम बोकडे, ठाकरे गटाचे रामदास गुडधे, भीमराव मंदनवार, माजी नगरसेविका दुर्गा रेहवाडे, काँग्रेसच्या लक्ष्मी बैलतवार, आदिमच्या विमल पौणीकर,यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.


