केदारांना तिसरा धक्का ? थेट आर्थिक कोंडी करून जेरीस आणण्याचा प्रयत्न

केदारांना तिसरा धक्का ? थेट आर्थिक कोंडी करून जेरीस आणण्याचा प्रयत्न

-राजकीय ताकद संपविण्याचा प्रयत्न

गजानन ढाकुलकर
नागपूर: एखाद्या व्यक्तीला राजकारणातून संपवायचे असेल तर त्याच्यावर व्यक्तिगत हल्ले करा, त्याची आर्थिक नाकेबंदी करा, अन् ऐन-केन प्रकारे त्याला शरण आणा. ऐवढे करूनही तो व्यक्ती मागे यायला तयार नसेल तर सत्तेचा वापर करून त्याला जेरीस आणा हे भाजपचे २०१४ नंतरच्या राजकारणाचे सुत्र राहिले आहे. याला महाराष्ट्रात काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेनेचे अनेक नेते बळी पडले. शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीला तर हेच सुत्र कारणीभूत ठरले. नागपूर जिल्ह्यात याच सुत्राचा वापर मागील काही वर्षापासून काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यावर केला जात आहे. अनेक वर्ष केदार यांच्या राजकीय वर्चस्वाखाली असलेल्या या बँकेवर राज्य शासनाने नुकताच प्रशासक नियुक्त करून सुडाच्या राजकारणाचा तिसऱ्या अंक पूर्ण केला आहे.

नागपूर जिल्हा २०१४ पर्यंत काँग्रेसचाच बालेकिल्ला. २०१४ मध्ये भाजपने नागपूर लोकसभेची जागा जिंकली असली तरी ग्रामीण भागात काँग्रेस घट्ट पाय रोवून उभी होती. सुनील केदार हे नागपूर ग्रामीणमधील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. संपूर्ण जिल्ह्यात सहकार चळवळीच्या माध्यमातून त्यांची पकड आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या सहाही मतदारसंघात ते निर्णायक प्रभाव राखून असलेले ते नेते आहेत.भाजपला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची ताकद आणि धमकही केदार यांच्यात आहे. त्यामुळेच जिल्ह्यात पक्षविस्तार करायचा असेल तर केदार यांची राजकीय ताकद संपवण्याशिवाय गत्यंतर नाही हे भाजपने ओळखले व त्यानंतर त्यानी केदार यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली. निवडणुकीच्या राजकारणात केदार यांचा पराभव अशक्य दिसत असल्याने शेवटी त्यांना न्यायालयीन प्रक्रियेतून अपात्र ठरवले. त्यानंतरच भाजपला सावनेर विधानसभा जिंकता आली.