का म्हणाले गडकरी? लोकांना मुर्ख बनवणे सोपे आहे, पण विश्वसनीयता कमावणे कठीण”

का म्हणाले गडकरी? लोकांना मुर्ख बनवणे सोपे आहे, पण विश्वसनीयता कमावणे कठीण”

-नेमका रोख कुणाकडे, राजकीय चर्चाना उधाण

प्रतिनिधी

नागपूर: आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरात राजकीय नेत्यांच्या विश्वसनीयतेबाबत केलेल्या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे ? असा सवाल राजकीय वर्तुळातून केला जात आहे. शनिवारी नागपुरात झालेल्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेत बोलताना गडकरी यांनी नेत्यांच्या विश्वसनीयतेचा मुद्दा मांडला. ” राजकीय नेते जसे बोलतात तसे करीत नाही,अशी नागरिकांची भावना आहे. त्यामुळे नेत्याबद्दलची विश्वसनीयता कमी होत आहे. लोकांना मुर्ख बनवणे सोपे आहे, पण विश्वसनीयता कमावणे कठीण” असे गडकरी म्हणाले. त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही, पण केंद्र व राज्यात सत्ता भाजपचीच असल्याने त्यांचा रोख कोणाकडे होता हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून नितीन गडकरी यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. ते १०० दिवस प्रचार करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. यामुळे राज्यात गडकरी सक्रिय होणार, अशा चर्चा सुरू झाल्या. ऐरवी गडकरींना पक्षाकडून डावलले जात असल्याच्याच चर्चा होत असत. प्रथमच ते प्रमुख भूमिकेत येणार ,असे वाटत असतानाच गडकरी यांनी थेट नेत्यांच्या विश्वसनीतेवर शंका घेतली. त्यामुळे असे काय घडले ? असा अनेक प्रश्न गडकरी यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झाला आहे.