उच्च न्यायालयाने फटकारले, अप्रत्यक्ष तडाखा गडकरी यांना !
-कामांमुळे नागपूरकरांना त्रास
प्रतिनिधी
नागपूर : भाजपचे नेते, केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ज्या खात्याने नाव दिले,‘ रोडकरी’, ‘पुलकरी’ अशी त्याची प्रतिमा देश-विदेशात निर्माण केली त्याच रस्ते व महामार्ग बांधणी मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नागपूरसह विदर्भातील कामांवर, कंत्राटदाराच्या मनमानीवर नागपूरच्याच उच्च न्यायालयाने कठोर शब्दात ओढलेले ताशेरे, गडकरींच्याच एकूण प्रतिमेलाच तडे देणारे ठरले आहे.
महाराष्ट्रात मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून पहिल्यांदा मंत्री होणाऱ्या गडकरी यांनी तेव्हा राज्यातील पहिला एक्सप्रेस हायवे (मुंबई-पुणे) विक्रमी वेळेत व कमी खर्चात बांधून रस्ते बांधणी क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवला होता. त्यानंतर त्यांना १५ वर्षानंतर केंद्रात रस्ते व महामार्ग मंत्री होण्याची संधी मिळाली. मागील दहा वर्षात त्यांनी याक्षेत्रात देशभरात विणलेले रस्त्यांचे जाळे, उड्डाण पुल बांधणीत वापरलेले नवनवे तंत्रज्ञान यामुळे त्यांची सर्वत्र कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख तयार झाली. ते स्वत: नागपूर -विदर्भातील असल्याने त्यांनी या भागात अनेक रस्ते बांधणीची कामे सुरू केली. नागपुरात तर एकाच वेळी अनेक उड्डाण पुलाची कामे त्यांच्या खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे.
गडकरी या कामांचा त्यांच्या भाषणातून वारंवार उल्लेख करतात. गडकरींचा ऐवढा विश्वास एनएचआयवर आहे की त्यांच्याकडून त्यांनी ‘बर्ड पार्क’, मेट्रोसाठी डबलडेकर पुल व इतरही कामे करून घेतली.रस्ते, पुल म्हंटले की गडकरी असेच चित्र सध्या नागपूर व विदर्भात आहे. पण याला एक दुसरीबाजूही आहे जी न्यायालयाच्या ताशेऱ्यांमधून ठसठशीतपणे पुढे आली आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याने व त्यामुळे प्रदीर्घ काळापर्यंत होणाऱ्या वाहतूक कोंडी, धुलीकणाचा त्रास, अपघात याला नागपूरकर कंटाळले आहेत. “ रस्ते, पुल नको, पण काम आवर” असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.


