अमरावतीत प्रकाश आंबेडकरांचे मोठे भाष्य : भाजपाला सत्तेवर बसविण्यासाठी…!

अमरावतीत प्रकाश आंबेडकरांचे मोठे भाष्य : भाजपाला सत्तेवर बसविण्यासाठी…!

-जरांगे यांचे बेमुदत उपोषण सूरू

प्रतिनिधी
अमरावती : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. एकेकाळी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आता मात्र त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमरावती येथे पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना आंबडेकर यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणावर भाष्य केले.

आता धस (आमदार सुरेश धस) विरुद्ध जरांगे पाटील असे सुरू झाले आहे का? की हे दुसरे काही आहे?, असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला. “भाजपाला पुन्हा सत्तेवर बसविण्यासाठी शेतकरी जसा दोषी आहे, तसे मनोज जरांगे पाटीलही दोषी आहेत. जे तुम्हाला मान्य करत नव्हते, त्यानांच मनोज जरांगेंनी सत्तेवर बसवले”, असाही आरोप आंबेडकर यांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. पण त्यांनी भाजपाला कधी लक्ष्य केले नाही. भाजपा एकेकाळी मनोज जरांगेंना मान्यता द्यायला तयार नव्हते, तरीही त्यानांच तुम्ही सत्तेवर बसवले”, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

तसेच कर्जमाफी विषयावर बोलत असताना प्रकाश आंबडेकर यांनी शेतकऱ्यांना मूर्ख असल्याचे संबोधले. ते म्हणाले, या सरकारने, आधीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी, व्याज माफीचे आश्वासने दिली होती. साता बारा कोरा करण्याची भाषा वापरली गेली. मी शेतकऱ्यांना मूर्ख यासाठी म्हणतो, कारण त्यांनी सत्तेवर पुन्हा कुणाला बसवले? मग आता पुन्हा रडत बसण्याचे कारण काय? शेतामध्ये जे पेरता तेच उगवते, तसेच कर्ज माफी करणार नाही, असे म्हणणारे सरकार तुम्ही निवडून दिले. ते आता कर्जमाफी देणार नसतील तर त्यात नवीन काय?