अमरावतीत दादांचा शब्द : आम्ही शेतकऱ्यांना ही मदत नक्की करूच

अमरावतीत दादांचा शब्द : आम्ही शेतकऱ्यांना ही मदत नक्की करूच

-नवनीत राणा यांच्‍या प्रचारार्थ सभा

कुमार तट्टे
अमरावती : सोयाबीन आणि कापूस उत्‍पादकांना क्विंटलवर नाही, तर आम्‍ही हेक्‍टरी मदत देण्‍याचा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्‍पात ४ हजार कोटी रुपयांची व्‍यवस्‍था करून ठेवली आहे. आम्‍ही शब्‍दाचे पक्‍के आहोत. उद्या मदत मिळाली नाही, तर अजित पवार ‘चले जाव’ असे तुम्‍ही म्‍हणा, विधानसभेच्‍या वेळी उभे करू नका, अशा शब्‍दात उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली.

भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्‍या प्रचारार्थ येथील संत ज्ञानेश्‍वर सांस्‍कृतिक भवनात शिव संभाजी स्‍वराज्‍य प्रतिष्‍ठानच्‍या वतीने आयोजित बहुजन मेळाव्‍यात ते बोलत होते. मेळाव्‍याला भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा, भाजप नेत्‍या चित्रा वाघ, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, रवी राणा आदी उपस्थित होते.

अजित पवार म्‍हणाले, सोयाबीन आणि कापूस उत्‍पादक शेतकरी यंदा मोठ्या आर्थिक संकटात सापडले. सोयाबीन आणि कापसाची माहिती वेळेत उपलब्‍ध झाली नाही, त्‍यामुळे या शेतकऱ्यांना आचारसंहिता लागू होण्‍याआधी मदत देता येऊ शकली नाही. पण, आम्‍ही अर्थसंकल्‍पात ४ हजार कोटींची व्‍यवस्‍था आधीच करून ठेवली आहे. आम्‍ही शब्‍दाचे पक्‍के आहोत. आम्‍हाला महायुती म्‍हणून विधानसभा निवडणुकीच्‍या वेळी पुन्‍हा तुमच्‍याकडे मत मागायला यायचेच आहे. जर मदत मिळाली नाही, तर आम्‍हास दारात उभे करू नका, असे अजित पवार म्‍हणाले.

एकीकडे नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्‍व आहे, तर विरोधकांची खिचडी आहे. नेतृत्‍व देण्‍याची क्षमता कुणाकडे नाही. राहुल गांधी यांच्‍याकडे तर ती क्षमता मुळीच नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली. नेतृत्‍व करणाऱ्याला देशातील विविध प्रश्‍नांची जाण असावी लागते. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. पुढे कोणत्‍या गोष्‍टी करायच्‍या, त्‍यांचे नियोजन पक्‍के आहे. दिल्‍लीत मोदींचे सरकार येईल. राज्‍यात आम्‍ही मदत करू. विरोधक काहीही बोलतात. त्‍यांच्‍या घरी आई-बहिणी आहेत की नाही, असा सवाल पवार यांनी केला. मोदी सरकार हे महिलांचा मानसन्‍मान राखणारे आहे, असे ते म्‍हणाले.