दानवेंनी वेधले लक्ष; अस्मानी संकटातील शेतकऱ्यांना मदतीचे काय?
-२८९ अनव्ये प्रस्ताव मांडून सभागृहात चर्चा करावी
प्रतिनिधी
मुंबई: एकीकडे शेतकरी शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे सुलतानी संकटाचा सामना करत होता, त्यातच अवकाळी पावसाने भर घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर अस्मानी संकटाने घाला घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत सभागृहाचे लक्ष वेधले.
२८९ अनव्ये प्रस्ताव मांडून सभागृहात चर्चा करून सरकारला यावर उत्तर देण्यास भाग पाडावे,अशी मागणी दानवे यांनी केली.
नाशिक जिल्ह्यातील माळवाडी गाव शेतकऱ्याने विकायला काढला असून शेतमालाला भाव मिळत नाही. एकीकडे सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर घोंगावत असताना अस्मानी संकट आता मोठा घाव करत आहे, यामुळे शेतकरी पूर्णतः कोलमडून पडला आहे.
शेतकरी छाती पेटून घेत असल्याची चित्रफीत पाहिली. नाफेडची खरेदी ही थंडावली असल्याने सरकारने या अस्मानी संकटावर चर्चा करावी. मदतीची केवळ पोकळ घोषणा न करता यावर चर्चा करावी. मागच्या वेळेस पण चार चार वेळेस राज्यात अतिवृष्टी झाली मात्र शेतकऱ्यांना मदत वेळेवर पोहोचली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नी २८९ अनव्ये चर्चा घ्यायला पाहिजे होती मात्र ती घेण्यात आली नाही. सरकार यावर काय मदत करणार आहे याची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणी दानवे यांनी केली.


