‘पदवीधर’मध्ये भाजपाची कोंडी : बंडखोरांना रोखण्यासाठी या मंत्र्यांवर जबाबदारी

  • ‘पदवीधर’मध्ये भाजपाची कोंडी : बंडखोरांना रोखण्यासाठी या मंत्र्यांवर जबाबदारी

-भाजपाच्या उमेदवाराविरोधात शिवसेना, राष्ट्रवादीचे अर्ज

प्रतिनिधी
पुणे : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने दोन उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ देऊन निवडणुकीत आणलेली रंगत आणि शिक्षक मतदारसंघात महायुतीमधील शिवसेनेने एका उमेदवाराला ‘एबी फॉर्म’, तर अन्य दोघांनी अपक्ष अर्ज भरल्याने महायुतीत बंडखोरीचा धसका घेतलेली भाजप कोंडीत सापडली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी भाजपचे मंत्री आणि नेत्यांची फौज रणांगणात उतरणार असून त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्याकडे या दोन्ही मतदार संघाच्या प्रभारी पदाची जबाबदारी असणार आहे. पुणे पदवीधर मतदार संघातून पाटील हे दोनवेळा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना या मतदार संघातील बारकावे माहीत आहेत. त्यामुळे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली दोन्ही मतदारसंघांच्या निवडणुका लढण्याचे भाजपने नियोजन केले आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दिमतीला भाजपचे अन्य मंत्री हे असणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे सहप्रभारी पदाची धुरा असणार आहे. याशिवाय भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांना निवडणूक प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. शरद लाड यांच्याकडे सह निवडणूक प्रमुखपद देण्यात आले आहे. पदवीधर मतदार संघातून पांडे आणि लाड हे दोघेही इच्छुक होते. आता भाजपने त्यांच्याच खांद्यावर निवडणुकीचा भार टाकला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप उर्फ भय्या माने यांना पक्षात घेऊन ‘एबी फॉर्म’ दिला आहे. तसेच माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची कन्या हर्षदा देशमुख-जाधव यांनाही ‘एबी फॉर्म’ दिल्याने नक्की उमेदवार कोण, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबतचा निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार हे घेतील, असे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिदे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.

शिक्षक मतदारसंघात शिवसेनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांना ‘एबी फाॅर्म’ देऊन अधिकृत उमेदवारी दिली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे माजी स्वीय सहाय्यक सचिन सानप हेदेखील या मतदारसंघातून इच्छुक होते. त्यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेच्या पुणे शहर सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत यांनीही अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेच्या या राजकीय खेळीने भाजपची कोंडी झाली आहे. महायुतीतील ही बंडखोरी क्षमविण्याची जबाबदारी आता भाजपच्या नेत्यांवर असणार आहे.