मोठी खळबळ : एकनाथ शिंदे यांच्यावर अन्याय झाल्याचे मत

मोठी खळबळ : एकनाथ शिंदे यांच्यावर अन्याय झाल्याचे मत

-सत्तेचा अहंकार झाला की ‘गोकुळ’ होत असल्याच्या प्रतिक्रिया

प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यावर अन्याय झाला असल्याचे म्हणत शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही अपेक्षा योग्यच असल्याचे विधान माजी मंत्र्याने केले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यातून केलेल्या गंभीर आरोपांमुळे शिंदे गटात मोठी खळबळ उडाली.

भाजपाचे कर्तृत्व केवळ फोडाफोडी आणि गद्दारीचे असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केली. सत्तेचा अहंकार झाला की ‘गोकुळ’ होते, असा सणसणीत टोला शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी भाजपाच्या नेत्याला लगावला. मिरा भाईंदर महासभेतील मारहाण प्रकरणी भाजपा आमदार नरेंद्र मेहतांवर कारवाई करा, अशी मागणी शिंदेसेनेच्या नेत्याने राज्यपालांकडे केली आहे.

शिंदेंवर अन्याय झालाय, माजी मंत्र्याचे विधान
एकनाथ शिंदे यांच्यावर अन्याय झाला असल्याचे वक्तव्य माजी मंत्री रामदास कदम यांनी केले. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे २३२ आमदार निवडून आले होते; पण त्यांना ऐनवेळी बाजूला ठेवण्यात आले. त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही अपेक्षा योग्यच असल्याचे कदम यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना शिंदेसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले आहे. शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वांचीच इच्छा असून आता हे सर्व आमदारांच्या हातात आहे, असे विधान शिंदेसेने आमदार किशोर दराडे यांनी केले होते. त्यांच्या सुरात सूर मिसळत आमदारांचे संख्याबळ वाढवून शिंदेंना मुख्यमंत्री करणार, असे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनीही या मागणीचे समर्थन केले. त्याचवेळी माजी मंत्री रामदास कदम यांनी शिंदेंवर अन्याय झाल्याचे वक्तव्य केल्याने भाजपाचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगेंच्या आरोपांनी शिंदेसेनेत खळबळ
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या नारायण गडावर घेतलेल्या दसरा मेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले. शिंदे साहेब तुम्ही मला ५०० कोटी रुपये द्यायचे असल्याचे सांगून भाजपाकडून ५०० कोटी रुपये घेतले, अशी कुजबूज सगळीकडेच सुरू आहे. तुम्ही खरंच मला ५०० कोटी रुपये दिले आहे का? जर मला पैसे दिले नसतील तर मग भाजपा नेमकी तुम्हाला संपतेय की तुम्ही मला संपवत आहात याचा छडा लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. तसेच आजच्या दसरा मेळाव्यातून किंवा उद्या संध्याकाळपर्यंत याचा खुलासा करावा, अन्यथा माझ्याकडे सर्व पुरावे आहे, असे आव्हानही त्यांनी शिंदे यांना दिले. जरांगे यांच्या या आरोपामुळे शिंदेसेनेत मोठी खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहे.

भाजपाचे कर्तृत्व केवळ फोडाफोडी आणि गद्दारीचे असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केली. पुणे पदवीधर मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सुनील मोदी यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना विनायक राऊत यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली. सत्तेच्या दडपशाहीविरोधात लढण्यासाठी सुनील मोदी यांना निवडून देऊन भाजपाला धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व हे इमानदारीने जनतेला आधार देणारे आणि मदतीला धावून जाणारे आहे. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. अशा लढाईत नेहमी जनशक्ती जिंकते, हा इतिहास आहे, असा विश्वासही विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.

मंत्री उदय सामंत यांचा भाजपा नेत्याला टोला
सत्तेचा अहंकार झाला की ‘गोकुळ’ होते, असा सणसणीत टोला शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी भाजपाचे नेते तथा मंत्री जयकुमार गोरे यांना लगावला. सत्तेचा माज बाळगल्यास मतदार कसा धडा शिकवतात, याचे जिवंत उदाहरण गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीचा निकाल असल्याचे सांगत त्यांनी महायुतीतील मित्रपक्षालाच घरचा आहेर दिला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना साधला. यावेळी त्यांनी जयकुमार गोरे यांच्यावर सडकून टीका केली. एखाद्याला एवढे हिणवणे योग्य नाही. आपल्या हातात सत्ता आहे, त्यामुळे आपण करू तीच पूर्वदिशा असा अहंकार जेव्हा डोक्यात जातो, तेव्हा गोकुळसारखी अवस्था होते, असे सामंत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असून भाजपाचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.