आज सायंकाळी 4 वाजता सुनावणी;शिवसेना कुणाची, ठाकरे की शिंदे?

आज सायंकाळी 4 वाजता सुनावणी;शिवसेना कुणाची, ठाकरे की शिंदे?

-केंद्रीय निवडणूक आयोगात महत्त्वपूर्ण सुनावणी

प्रतिनिधी
नवी दिल्ली : शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाला? यावरून केंद्रीय निवडणूक आयोगात सध्या एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गटाची घमासान लढाई सुरू आहे. आज पुन्हा या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगात महत्त्वपूर्ण सुनावणी होत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या 23 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे आजची सुनावणी दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

धनुष्यबाण कुणाचा?, या वादावर मंगळवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी शिवसेनेत फूट पडलीच नाही. तसेच, सध्या दाखवण्यात येणारे चित्र कपोलकल्पित असल्याचा दावा केला. शिंदे गटाने दिलेली शपथपत्रे खोटी असून या सर्वांची ओळखपरेड घ्या, तरच सत्यता समोर येईल, असेही आयोगाला सांगितले. त्यामुळे आयोग यावर आज काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

–मुदतवाढ व परवानगी

दुसरीकडे, शिवसेना प्रमुखपदाचा उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपत आहे. त्यामुळे ठाकरे गटाने फेरनिवडीसाठी निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे. एक तर पक्षांतर्गत निवडणुकांना परवानगी द्या, नाही तर अंतिम निर्णयापर्यंत या पदासाठीची मुदतवाढ द्या, अशी मागणी ठाकरे गटाने आयोगाला केली आहे. ठाकरे गटाची ही मागणी निवडणूक आयोग मान्य करणार का?, यावर उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचे भवितव्य ठरणार आहे.

–शिंदेंचा अजब दावा

तर, शिवसेनेतील पक्षप्रमुख हे पद पक्षाच्या घटनेशी सुसंगत नाही, त्यामुळे बेकायदेशीर आहे, असा दावा शिंदे गटाने केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षप्रमुखपद निर्माण केले असून जुन्या घटनेत बदल न करताच झाले, असा आरोप गेल्या सुनावणीत शिंदे गटाने केला होता.

-शिंदे हे मुख्य नेता नाही

शिंदे गटाच्या या आरोपांवर ठाकरे गटाचे वकिल सनी जैन यांनीही प्रत्युत्तर दिले होते की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते असताना ‘पक्षाच्या संविधानावर श्रद्धा आणि निष्ठा ठेवेन’, अशी शपथ घेतली. आज त्याच घटनेला ते बेकायदा म्हणत आहेत. शिंदे स्वत:ला ‘मुख्य नेता’ म्हणत आहेत. मुळात शिवसेनेच्या घटनेत असे कोणतेही पद नाही.आज सायंकाळी 4 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. आजच्या सुनावणीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.