मनोहर जोशी म्हणतात; ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात जाण्याविषयी !
-माझं रक्त शिवसेनेचे आहे
प्रतिनिधी
मुंबई : मी पहिल्यापासून आतापर्यंत शिवसेनेत आहे, मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सातत्याने उभा आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केले. वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी मनोहर जोशी सरांची भेट घेतली. यावेळी संवाद साधताना त्यांनी ठाकरे गटात असल्याचं स्पष्ट केले.
माझं रक्त शिवसेनेचे आहे. आधी शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास, नंतर उद्धवजींचा सहवास, मी महाराष्ट्र, शिवसेनेसाठी आहे. शिवसेना ही संघटना महाराष्ट्रावर अतोनात प्रेम करते. बाळासाहेबांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकलो याचे समाधान असल्याचे मनोहर जोशी बोलताना म्हणाले. मी उद्धव ठाकरेंसोबत सातत्याने उभा आहे. मी पहिल्यापासून आतापर्यंत शिवसेनेत आहे, असे मनोहर जोशी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात जोशी जाणार असल्याच्या चर्चांना फुलस्टॉप मिळाला आहे. जोशी हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षात असल्याचे स्पष्ट झाले.
-यापूर्वी झाली शिंदे-जोशी यांची भेट
जुलै महिन्यात एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांच्या दादर परिसरातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी जोशी कुटुंबीयांकडून एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांच्याशी काही वेळ गप्पा मारल्या होत्या. मनोहर जोशी हे आपल्या नेहमीचा सफारी घालून होते. एकनाथ शिंदे यांच्याशी बोलताना मनोहर जोशी चांगलेच उत्साहात दिसत होते. शिंदे हे पंतांचा हात हातात घेऊन जिव्हाळ्याने बोलताना दिसले. यावेळी मनोहर जोशी आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर बुद्धिबळाचा डावही मांडला होता. त्यामुळे या भेटीत शिंदे आणि जोशी यांनी एखादा नवा राजकीय डाव रचण्याविषयी चर्चा केली का, अशा चर्चांना सुरुवात झाली होती.
-पहिल्या फळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक
मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेतील पहिल्या फळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना मनोहर जोशी यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपदही भुषविले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे हाती घेतल्यानंतर मनोहर जोशी हे गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत बिलकूल सक्रिय नव्हते. उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतून उतरल्यामुळे एकेकाळी मुख्यमंत्री राहिलेल्या पंतांना शिवसेनेच्या पक्षसंघटनेतून अलगद बाजूला करण्यात आले होते. त्यानंतर मनोहर जोशी शिवसेनेत अडगळीतच पडले होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, आता एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर मनोहर जोशी हे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.


