काय आहे प्रकरण? केंद्रीयमंत्री गडकरी यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा

  1. काय आहे प्रकरण? केंद्रीयमंत्री गडकरी यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा

-नागपूरचे राजकारण वेगळ्या वळणावर

प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्याविरोधात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्यारे खान यांची अध्यक्षपदावरून तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी या दोन्ही संघटनांनी केली आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर शनिवारी आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयही आहे. राजकीय पाठबळामुळे प्यारे खान यांची या पदावर नियुक्ती झाल्याचा आरोप या हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे नितीन गडकरी आणि भाजपाला नागपूरमध्ये विरोधाला सामोरे जावे लागत आहे.

नागपूरचे व्यावसायिक आणि ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक असलेले प्यारे खान हे करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पहिल्यांदा चर्चेत आले होते. त्या काळात त्यांनी नागपूर आणि आसपासच्या रुग्णालयांमध्ये ४०० मेट्रिक टनांहून अधिक द्रवरूप ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी तब्बल ८५ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला होता. त्यानंतर प्रशासनाने हा खर्च परत करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, रमजानच्या काळात मदत करणे हे मानवतावादी कर्तव्य असल्याचे सांगत खान यांनी पैसे घेण्यास नकार दिला होता. या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑक्सिजन वाहतुकीच्या नियोजनात मदत केली होती, तर तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टँकर्स उपलब्ध करून देण्यात सहकार्य केले होते. या सामाजिक कार्यामुळे खान यांना ‘ऑक्सिजन मॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. करोना महामारीनंतरही खान यांचे राजकीय नेत्यांशी संबंध कायम राहिले.

२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नितीन गडकरी यांचा प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून निमंत्रण मिळाल्यानंतर त्यांनी सूफी कॉरिडॉरच्या विकासकामातही सहभाग घेतला. तसेच ताजबाग दर्गा परिसरातील बेकायदा अतिक्रमणे हटवण्याच्या कामात मदतही केली. ३ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र सरकारने प्यारे खान यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केली. राज्यातील अल्पसंख्याक समुदायांचे हक्क आणि हितसंबंध जपण्याची जबाबदारी या वैधानिक आयोगावर आहे. मात्र, त्यांच्या नियुक्तीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील काही संघटनांनी विरोध केला आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी आयोगाच्या अध्यक्षपदी मुस्लीम व्यक्तीची नियुक्ती करण्यावर प्रश्न उपस्थित केले. काही अन्य राज्यांमध्ये शीख किंवा जैन समुदायातील व्यक्ती अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच राजकीय पाठबळामुळे खान यांना हे पद मिळाल्याचा आरोपही त्यांनी केला.

-प्यारे खान व अबू सालेम भेट
सप्टेंबर महिन्यात प्यारे खान यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड अबू सालेमची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले. या भेटीच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि विहिंपची महिला शाखा दुर्गा वाहिनी यांनी नागपुरात आंदोलन केले. खान यांनी अबू सालेमची भेट घेतली आणि त्याच्या सुटकेच्या बाजूने भूमिका मांडली, असा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. मात्र, प्यारे खान यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावताना आपण सालेमच्या सुटकेच्या बाजूने बोललो नसल्याचे स्पष्ट केले. तसेच आपली नियुक्ती करणाऱ्या प्राधिकरणाने पद सोडण्यास सांगितले, तर ‘३० सेकंदांत राजीनामा देणार’ असेही ते म्हणाले होते.

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या पाठिंब्यामुळे प्यारे खान यांचे राजकीय वजन वाढले, असा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा आरोप आहे. त्यामुळे या आंदोलनाचे लक्ष्य गडकरी असल्याचे सांगितले जात आहे. या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही नाव आले आहे. नागपुरात नुकत्याच झालेल्या संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात प्यारे खान उपस्थित राहिल्याबद्दलही हिंदुत्ववादी संघटनांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आमच्या आंदोलनाला संघातील वरिष्ठ सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा विहिंपच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. तसेच आंदोलनासाठी संघाकडून समन्वय आणि मार्गदर्शन मिळत असल्याचे त्यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले आहे. दरम्यान प्यारे खान यांनी नागपुरातील एका गरबा कार्यक्रमाला भेट दिल्यानंतर विहिंपने त्या ठिकाणच्या मंचाचे ‘शुद्धीकरण’ केले होते. त्यावेळी गोमूत्र आणि गंगाजल शिंपडत हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. तसेच आयोजकांना वराहाची प्रतिमा भेट देण्यात आली आणि कार्यक्रमाला मुस्लिमांना आमंत्रित करू नये, असेही सांगण्यात आले.