पदवीधर निवडणूक : दोन्ही शिवसेनामुळे काय आहे भाजपासमोर आव्हान

पदवीधर निवडणूक : दोन्ही शिवसेनामुळे काय आहे भाजपासमोर आव्हान

-मुख्यमंत्र्यांनी सूत्रे सांभाळली

प्रतिनिधी
पुणे : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात भाजपच्यादृष्टीने सकारात्मक वातावरण असल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच शिक्षक मतदार संघामध्ये महायुतीतील शिवसेना (शिंदे) पक्षामुळे आणि पदवीधरमध्ये शिवसेना (ठाकरे) या पक्षामुळे भाजपसाठी ही निवडणूक आव्हानात्मक झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या निवडणुकीच्या प्रचाराकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे.

पुण्यानंतर ते सोमवारी (१९ ऑक्टोबर) कोल्हापूर आणि सांगली येथे दौऱ्यावर असणार आहेत. या दोन जिल्ह्यांमध्ये मतदारांची संख्या ही पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांपेक्षा जास्त असल्याने या दोन जिल्ह्यांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे.

पदवीधर मतदार संघात भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव या आहेत. या मतदार संघात शिवसेना (ठाकरे) पक्षाने सुनील मोदी यांना उमेदवारी दिली आहे. मोदी हे कोल्हापूर महापालिकेचे काँग्रेसचे विद्यमान स्वीकृत नगरसेवक आहेत. ते तत्कालीन शिवसेनेचे कोल्हापूरचे माजी शहरप्रमुखही आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे ‘राष्ट्रवादी’ला फटका बसण्याची शक्यता असाली, तरी त्यांच्याकडून भाजपविरोधात प्रचार केला जात असल्याने मतविभाजन होऊ नये, यासाठी भाजपकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी भाजपने आता कोल्हापूर आणि सांगलीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी या दोन्ही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जाऊन प्रचार यंत्रणेचा आढावा घेणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

शिक्षक मतदार संघात भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाने मंगेश चिवटे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांची उमेदवारी मागे घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपक्ष उमेदवार, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे माजी स्वीय सहायक सचिन सानप यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यानंतर शिवसेनेचे महानगरप्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर हे प्रचारात सक्रिय झाले असून, त्यांनी भाजपला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांमध्ये पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. मतदार नोंदणीसाठी भाजपने विशेष प्रयत्न करूनही पदवीधर मतदार संघात तीन लाख सात हजार ८२३ पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे. २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत चार लाख २६ हजार २५७ मतदार होते. त्यामुळे एक लाख १८ हजार ४३४ मतदार कमी झाले आहेत.

शिक्षक मतदार संघातील मतदारांचीही संख्या कमी झाली आहे. ५१ हजार ७५० शिक्षक मतदारांची नोंदणी झाली आहे. गेल्या निवडणुकीत ७२ हजार ५४५ शिक्षक मतदार होते. त्यामुळे २० हजार ७९५ शिक्षक मतदारांची संख्या घटली आहे.

भाजपने पुण्यातील प्रत्येक नगरसेवकाला प्रत्येकी १५०० आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नगरसेवकाला ५०० पदवीधर मतदार नोंदविण्याचे लक्ष्य दिले होते. ते साध्य झाले नसल्याचे दिसून आले. तसेच उमेदवारांच्या प्रचारासाठी गैरहजर राहिल्याने भाजपने १०० नगरसेवकांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यात पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक घेऊन संबंधितांना फैलावर घेतले. यापुढे पदे देताना ‘रिपोर्ट कार्ड’ पाहिला जाईल, असा इशाराही दिला आहे.

मतदार नोंदणीसाठी पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असताना, दोन्ही शिवसेनेने सकारात्मक निवडणूक आव्हानात्मक केल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर या मतदार संघांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. त्यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेदेखील असल्याने भाजपने ही निवडणूक आता गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे पदाधिकारीही कामाला लागल्याचे दिसून येत आहे.