शिवसेनेची वाट : बच्चू कडू यांच्यासमोर या आहेत अडचणी !

शिवसेनेची वाट : बच्चू कडू यांच्यासमोर या आहेत अडचणी !

-विदर्भ भक्कम करण्यासाठी या उपाययोजना

प्रतिनिधी
नागपूर : शेतकरी हाच धर्म मानणारे आणि आत्ता कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या मांडीवर जाऊन बसणारे प्रहार संघटनेचे नेते व माजी मंत्री बच्चू कडू यांचा शिवसेना शिंदे गटातील प्रवेश वरवर जरी कडू यांच्यासाठी राजकीय सोयीचा वाटत असला तरी सध्या या पक्षातील विदर्भातील नेत्यांची संख्या, त्यांचे वर्चस्ववादी राजकारण लक्षात घेता ते कडू यांना सहजासहजी पक्षात स्थिरावू देतील, असे वाटत नाही. त्यामुळे त्यांचा पहिला संघर्ष पूर्वश्रमीच्या नेत्यांसोबतच होण्याची शक्यता आहे.

विदर्भात सध्या शिंदे गटाची ताकद मर्यादित असली, तरी प्रत्येक नेत्याने आपापल्या जिल्ह्यात स्वतंत्र प्रभाव निर्माण केला आहे. पश्चिम विदर्भात विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव (बुलढाणा लोकसभा मतदारसंघ) ,राज्यात मंत्री असलेले ,संजय राठोड (दिग्रस विधानसभा), तर पूर्व विदर्भातील राज्यमंत्री आशीष जयस्वाल (रामटेक विधानसभा मतदारसंघ) , आ. संजय गायकवाड,( बुलढाणा विधानसभा मतदारसंघ), आ. नरेंद्र भोंडेकर (भंडारा विधानसभा मतदारसंघ ) आ. कृपाल तुमाने (विधान परिषद सदस्य, माजी खासदार रामटेक लोकसभा), आ. भावना गवळी ( विधान परिषद सदस्य आणि माजी खासदार वाशीम लोकसभा मतदारसंघ) यांचा त्यांच्या मतदारसंघात प्रभाव आहे. ते त्यांच्या जिल्ह्यातस्वत:ला सुभेदार मानणाऱ्यांपैकी एक आहेत. हे सर्व नेते सुरुवातीपासून शिंदे गटासोबत राहिले आहेत. आता त्याच बच्चू कडू यांची भर पडली आहे. त्यांना आता या पूर्वस्थापित नेतृत्वाच्या चौकटीत राहून राजकारण करावे लागणार आहे.

बच्चू कडू यांची आजवरची राजकीय शैली ही स्वतंत्र आणि संघर्षप्रधान राहिली आहे. शेतकरी, दिव्यांग, कर्जमाफी यांसारख्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांनी स्वतःचा स्वतंत्र “प्रहार” ब्रँड उभा केला. त्यामुळे दुसऱ्याचे नेतृत्व स्वीकारण्याची त्यांची राजकीय मानसिकता नाही, याच कारणामुळे शिंदे गटातील जुन्या नेत्यांशी त्यांचा संघर्ष उभा राहू शकतो. यामुळे शिंदे यांच्यासमोरही नवे राजकीय आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. कडूंना अधिक महत्त्व दिल्यास जुने नेते नाराज होऊ शकतात; तर जुन्या नेत्यांना प्राधान्य दिल्यास कडू अस्वस्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी विदर्भातील शिंदे सेनेत आगामी काळात “जुने विरुद्ध नवे” असा अंतर्गत संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

विशेष म्हणजे विदर्भातील शिंदे गटातील अनेक नेते भाजपशी जवळीक ठेवून राजकारण करत असल्याचे मानले जाते. दुसरीकडे बच्चू कडूंनी पूर्वी कर्जमाफी आंदोलनाच्या काळात भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांनी लक्ष्य केले होते. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये कडूंविषयी अद्यापही नाराजी असल्याचे बोलले जाते.

कडूंच्या प्रवेशामागे राजकीय गणित स्पष्ट आहे. कडूंच्या माध्यमातून शिंदे सेनेला “आंदोलनात्मक चेहरा” मिळतो, शेतकरी वर्गात थेट पोहोच वाढते. उद्धव ठाकरे गटाविरोधात भावनिक प्रतिमा मजबूत होते. त्याच बरोबर शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे कडू यांना सत्तेच्या केंद्राजवळ राहता येते , भविष्यात मंत्रीपद मिळू शकते, राजकीय गुन्हे मागे घेतले जाऊ शकते, प्रहार संघटनेला आर्थिक-राजकीय आधार मिळू शकतो. त्यामुळे दोघांच्या राजकीय सोयीचा हा पक्षप्रवेश ठरतो.

बच्चू कडूंचा हा शिंदे गटातील प्रवेश केवळ पक्षांतर विदर्भातील सत्तेच्या नव्या मांडणीची सुरुवात ठरू शकतो. मात्र ही युती विचारसरणीपेक्षा राजकीय सोयीवर आधारलेली असल्याने तिची टिकाऊपणा आगामी राजकीय घडामोडींवर अवलंबून राहणार आहे. एका बाजूला हिंदुत्ववादी, भाजपसमर्थक सत्ताकेंद्राभोवती फिरणारी शिंदे सेना तर दुसऱ्या बाजूला सत्तेविरोधी प्रतिमेचा बच्चू कडू. या दोन प्रवाह एकत्र आले असले, तरी त्यात अंतर्गत तणाव कायम राहण्याची शक्यता अधिक आहे.