बच्चू कडू यांनी सांगितले, प्रहारच्या विलीनीकरणाचे खरे कारण ?
-न्यूज-१८ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उलघडले गुपित
प्रतिनिधी
मुंबई : बच्चू कडू यांनी प्रहार राजकीय पक्ष विलीन करुन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हे विलीनीकरण आणि पक्षप्रवेश झाला आहे. या प्रवेशावर बच्चू कडू यांनी भूमिका स्पष्ट केली. “झेंडा हातात घेतला असला तरी अजेंडा बदलणार नाही”, असे कडू यांनी सांगितले.
सत्तेशिवाय पक्ष चालवणे फार कठीण असल्याची कबुली कडू यांनी दिली. याशिवाय त्यांचा राजकीय प्रवास, शेतकरी आंदोलन आणि विविध विषयांवर कडू यांनी भाष्य केले. न्यूज-१८ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कडू बोलत होते.
आर. आर. पाटलांनी दिली होती राज्यमंत्रीपदाची ऑफर
शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय राजकीय परिस्थितीतून घेतल्याचे बच्चू कडू म्हणाले. पाचवेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढली आणि चारवेळा विजयी झालो हा एक प्रकारे इतिहासच असल्याचे कडू म्हणाले. “पहिल्यांदा जिंकून आल्यानंतर त्यावेळी स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी राज्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन देत राष्ट्रवादी प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. पण, ही ऑफर नाकारली होती”, असा खुलासाही बच्चू कडू यांनी केला.
“चळवळीतील माणसाला राजकारण साध्य का होत नाही? हा मोठा प्रश्न आहे. चळवळीतील सर्व नेते थांबले आहेत. राजू शेट्टी थांबले, अजित नवले आले नाहीत. विजय जावंधिया प्रचंड अभ्यासू नेते पण, लोकसभा खासदार होऊ शकत नाहीत ही आमच्यासाठी शोकांतिका होती. शरद जोशी राजकारणात पडले, बाबासाहेबांना पडावं लागलं, हे का होतंय हा मोठा प्रश्न आहे”, असे बच्चू कडू म्हणाले. “झेंडा बदलला असला तरी अजेंडा बदलणार नाही”, अशा शब्दात कडू यांनी भूमिका स्पष्ट केली.
२०२९ च्या विधानसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करताना त्यांनी निवडणूक लढण्याचे स्पष्ट केले. ज्या मतदारसंघातून राजकारण सुरू झाले तिथे लढण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. २०२९ मध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना अशा लढाईचे संकेतही त्यांनी दिले. पक्षप्रवेश आणि प्रहारच्या विलीनीकरणाबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. “कर्जमाफी तुमच्यामुळे झाली तरी लोकांची गर्दी का होत नाही? असा प्रश्न कार्यकर्ते विचारु लागले. शेतकऱ्यांसाठी लढून देखील ताकद का वाढत नाही हा प्रश्न नाहीये का? जातीसाठी लढलो असतो तर जातीचा नेता झालो असतो”, असे कडू म्हणाले.
सत्तेशिवाय पक्ष चालविणे कठीण आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना बच्चू कडू यांनी “फार कठीण आहे”, असे उत्तर दिले. “पहिल्यांदा पत्रिका घेऊन आलेले तान्हाजी लढाईला निघून गेले. पण, आता लग्नाला आले नाही म्हणून कार्यकर्ता तुटतो, अशा कार्यकर्त्यांची संख्या वाढत चालली आहे”, असे कडू म्हणाले. “तळागाळातले किती नेते वर आले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एका -एका घरात चार – चार आमदार – खासदार – मंत्री असतात? हे कसं पचवून घेतात लोकं. बच्चू कडू गुवाहाटीला गेले म्हणून पडले सांगतात, पण गुवाहाटीला गेलेले इतर सर्व निवडून आले. मग माझे काय पाप होते? पक्ष नव्हता, जात नव्हती म्हणूनच ना?”, असेही कडू म्हणाले.


