नेमके कारण काय? तृणमूलचे २८ पैकी २० खासदार कुणी फोडले?
-ज्येष्ठ नेत्या काकोली घोष चर्चेच्या केंद्रस्थानी
प्रतिनिधी
पश्चिम बंगाल : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले आहे. आधीच पक्षातील ८० पैकी तब्बल ६० आमदारांनी ममता यांच्याविरोधात बंडाचे हत्यार उपसले आहे. त्यातच आता तृणमूलचे २८ पैकी २० खासदारही फुटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आली आहे. या फुटीर गटाचे नेतृत्व करणाऱ्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या काकोली घोष दस्तीदार सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. तृणमूल काँग्रेसच्या अनेक खासदारांनी केंद्रातील भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. त्या संदर्भातील पत्रही आम्ही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केल्याचा दावा दस्तीदार यांनी केला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या प्रभावशाली नेत्या म्हणून काकोली घोष दस्तीदार यांची ओळख आहे. सद्या त्यांच्याकडे अखिल भारतीय तृणमूल महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या काकोली दस्तीदार जवळपास पाच दशकांपासून तृणमूल काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. त्यांना ममता बॅनर्जी यांच्या सर्वात जुन्या राजकीय सहकाऱ्यांपैकी एक मानले जाते. काकोली दस्तीदार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात कोलकाता येथील काँग्रेसच्या विद्यार्थी चळवळीतून झाली. कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी विद्यार्थी राजकारणात सक्रियपणे सहभाग घेतला होता. त्याच काळात ममता बॅनर्जी या जोगमाया देवी महाविद्यालयातून आपली राजकीय ओळख निर्माण करत होत्या.
–विद्यार्थी चळवळीतून राजकारण
१९८४ मध्ये ममता बॅनर्जी यांनी जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दिग्गज नेते सोमनाथ चॅटर्जी यांचा पराभव करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर दस्तीदार आणि बॅनर्जी यांचे राजकीय संबंध अधिकच दृढ झाल्याचे सांगितले जाते. गेल्या काही वर्षांत काकोली दस्तीदार या तृणमूल काँग्रेसमधील एक आघाडीच्या संघटनात्मक नेत्या आणि पक्षाचा महत्त्वाचा महिला चेहरा म्हणून उदयास आल्या. त्यांनी ‘बारासात’ लोकसभा मतदारसंघाचे अनेक वेळा प्रतिनिधित्व केले. २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काकोली यांनी या मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला होता. संसदेत त्यांनी नेहमीच सार्वजनिक आरोग्य आणि समाजकल्याण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर पक्षाची बाजू खंबीरपणे मांडली आहे. लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या उपनेत्या म्हणूनही काकोली यांनी काम पाहिले आहे.
-बारासात मतदारसंघातून सलग विजय
गेल्या वर्षी महुआ मोइत्रा यांच्यासोबत झालेल्या वादानंतर तृणमूल काँग्रेसचे मुख्य प्रतोद कल्याण बॅनर्जी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाने या पदावर काही दिवसांसाठी काकोली यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या बंडाची पाळेमुळे तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत फेरबदलात दडली असल्याची चर्चा आहे. काकोली यांना मुख्य प्रतोद पदावरून हटवून तृणमूल काँग्रेसने पुन्हा ही जबाबदारी कल्याण बॅनर्जी यांच्याकडे सोपवली होती. या निर्णयानंतर काकोली आणि पक्ष नेतृत्व यांच्यातील संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आणि त्यांच्यात मतभेद सुरू झाल्याचे सांगितले जाते. राजकारणाबरोबरच वैद्यकीय क्षेत्राची पार्श्वभूमी असलेल्या काकोली यांनी एक प्रभावी खासदार आणि वरिष्ठ संघटनात्मक नेत्या म्हणून पक्षात मजबूत स्थान निर्माण केले आहे. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे त्या आता तृणमूल काँग्रेसमधील संभाव्य फुटीचा प्रमुख चेहरा बनल्या आहेत.
–तृणमूल काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर
तृणमूल काँग्रेसमधील संभाव्य फुटीचे संकट दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. या घडामोडींमधील सर्वात गंभीर बाब म्हणजे- पक्षातील सुमारे २० खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे संसदेत स्वतंत्र आसनव्यवस्थेची मागणी केल्याचे वृत्त समोर आले आहे. या गटात वरिष्ठ नेत्या काकोली घोष दस्तीदार यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. आपल्यावरील संधीसाधूपणाचे सर्व आरोप फेटाळून लावत दस्तीदार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाम भूमिका मांडली. माझे शीर कापले तरी चालेल, पण मी झुकणार नाही… आम्ही आतापर्यंत खूप सहन केले आहे. २०११ मध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी राजकारणात आले नाही. गेली ४० वर्षे मी या लढ्यात आहे. त्यामुळे अशा लोकांच्या बोलण्याचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, बारासात मतदारसंघाच्या खासदार असलेल्या काकोली घोष दस्तीदार यांना मुख्य प्रतोद पदावरून हटवून त्यांच्या जागी कल्याण बॅनर्जी यांची नियुक्ती केल्यापासूनच त्यांनी पक्ष नेतृत्वाविरोधात युद्धाचे रणशिंग फुंकले होते. या निर्णयानंतर अवघ्या काही दिवसांतच दस्तीदार यांनी पक्ष नेतृत्वावर कडाडून टीका करत आपल्या सर्व पक्षीय पदांचा राजीनामा दिला होता.
-विधान परिषदेत भाजपाची सरशी
विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थितीही पूर्णपणे बदलल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसचे नेते तथा मुख्यमंत्री बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी संतप्त जमावाने लक्ष्य केले होते. विविध अहवालानुसार, आता तृणमूल काँग्रेसचे अव्वल नेतेही पक्षाच्या धोरणांविरोधात जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. आतापर्यंत पक्षाच्या सुमारे १०० हून अधिक नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे, पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि नेते पूर्वी केवळ ‘दीदी’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जी यांचा उल्लेख आता थेट त्यांच्या नावाने करू लागल्याचे दिसून येत आहे. यावरून ममता यांची पक्षावरील पकड सैल झाल्याचे सांगितले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे तृणमूल काँग्रेससमोरील आव्हाने आणखीनच वाढली असून पक्षाच्या भविष्यासंदर्भात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


