हे ठरलंय कारण : राष्ट्रवादीच्या या दोन बड्या नेत्यांना डावलले !
-पक्षाची १२ सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणी
प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गुवाहाटीला गेले होते. तिथे पोहोचताच त्यांच्या मोबाईलवर पक्षाच्या अध्यक्षा व महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्राची प्रत आली. या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नवीन यादी देण्यात आली होती. मात्र, त्यात आपली नावे नसल्याचे पाहून दोन्ही नेते चकित झाले. विशेष म्हणजे, तटकरे आणि पटेल ज्या विमानाने गुवाहाटीला आले होते, त्याच विमानातून सुनेत्रा पवार यादेखील प्रवास करीत होत्या. तरीही त्यांनी या निर्णयाबाबत दोन्ही नेत्यांना कोणतीही कल्पना दिली नव्हती.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत फेरबदलांचा हा धक्का केवळ प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यापुरताच मर्यादित नाही, तर पक्षातील इतर अनेक बड्या नेत्यांनाही यातून बाजूला सारण्यात आले. पक्षातील या १२ सदस्यीय राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील यांसारख्या अत्यंत ज्येष्ठ नेत्यांनाही स्थान मिळालेले नाही. याउलट, सुनेत्रा पवार यांचे दोन्ही पुत्र राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांची अनुक्रमे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे राष्ट्रवादीच्या २२ सदस्यीय कार्य समितीच्या एका वेगळ्या यादीत आहेत, मात्र, त्या यादीतही त्यांच्या पदांचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सोमवारी रात्री आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली.
इंटरनेटवर फिरत असलेल्या या याद्यांमध्ये काही चुका झाल्या असून, लवकरच त्यामध्ये सुधारणा केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. मात्र, असे असले तरी, या याद्यांवरून सुनेत्रा पवार आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी पक्षावर आपले संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. १९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून पक्षाशी जोडले गेलेले अनेक वरिष्ठ नेते या नव्या नेतृत्वाच्या जवळच्या गटात दिसत नाहीत. तसेच, त्यापैकी कोणालाही राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून स्थान देण्यात आलेले नाही. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना डावलल्याची चर्चा सध्या पक्षात जोरात असून, हा निर्णय म्हणजे सुनेत्रा पवार यांनी पक्षावर आपल्या कुटुंबाचे वर्चस्व कायम असल्याचा ठाम संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. “त्यांचा संदेश अगदी स्पष्ट आहे, सांगितल्याप्रमाणे काम करा, अन्यथा कामच करूच नका,” असे राष्ट्रवादीच्या एका आमदाराने नाव न घेण्याच्या अटीवर दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या फेररचनेत शिवाजीराव गर्जे आणि जय पवार यांची पक्षाच्या मुख्य कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच, दिल्लीतील तुलनेने कमी परिचित असलेल्या काही नेत्यांनाही राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून संधी देण्यात आली. त्याशिवाय पवार कुटुंबातील नातेवाईक अभिषेक बोके आणि अविनाश आडिक यांनाही राष्ट्रीय सचिव म्हणून पदे देण्यात आली. “या वादाची पाळेमुळे अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनानंतरच्या घडामोडींमध्ये आहेत. त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली होती,” असे राष्ट्रवादीतील एका पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी ३१ जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीच्या पूर्वसंध्येला झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीचाही उल्लेख केला. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याविरोधात हा एक प्रकारचा बंडखोरीचा प्रयत्न असल्याचे समजले जात होते, असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, १६ फेब्रुवारी रोजी आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे गटाने निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादीच्या सुधारित पक्षघटनेची प्रत सादर केल्याची माहिती समोर आली. या मसुद्यात पक्षाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांना समान अधिकार देण्याची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले जाते. आपले अधिकार कमी करण्याचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी थेट निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले की, २८ जानेवारी (अजित पवार यांच्या निधनाचा दिवस) ते २६ फेब्रुवारी (ज्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली) या महिनाभराच्या कालावधीत पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कोणत्याही पत्राची किंवा संवादाची दखल घेतली जाऊ नये. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणखी तीव्र झाल्याचे मानले जात आहे.


