दिल्लीत मोठी घडामोड : ठाकरे सेनेचे हे खासदार जाणार नाही

दिल्लीत मोठी घडामोड : ठाकरे सेनेचे हे खासदार जाणार नाही

-एकनाथ शिंदेंकडून ‘ऑपरेशन टायगर’

प्रतिनिधी
नवी दिल्ली : उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांना ऐतिहासिक बंड केल्यानंतर आता पुन्हा एकदा चार वर्षांनी एकनाथ शिंदेंकडून ऑपरेशन टायगरअंतर्गत ठाकरेंचे सात खासदार फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. ठाकरेंचे काही खासदार दिल्लीत पोहोचले असून त्यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही दिल्लीत पोहोचले आहेत. हे खासदार आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं जातंय.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरेंच्या नऊ खासदारांपैकी तब्बल सात खासदार फुटण्याच्या मार्गावर असून केवळ अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे दोघेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याची शक्यता आहे. तर, बंडखोर खासदारांपैकी चार जण दिल्लीत असून ते बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सभागृहात त्यांना एक स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याची विनंती करणारे पत्र ते अध्यक्षांना सादर करतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, ठाकरेंचे ते सात खासदार कोण याबाबतही चर्चा आहे.

-मातोश्रीवरील बैठकीत होते हे हजर

ऑपरेशन टायगर रोखण्याकरता मातोश्रीवर रविवारी खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला ९ पैकी चारच खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. चार खासदारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला हजेरी लावली, तर एका खासदाराने फोनवरून उद्धव ठाकरेंशी संवाद साधल्याचे सांगितलं गेलं.

मुंबई उत्तर-पूर्वचे खासदार संजय दिना पाटील आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं की, ते उद्धव यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत आणि आपापल्या मतदारसंघातच आहेत. उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यात असून, त्यांचे चुलत भाऊ आणि काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या २००६ मधील हत्या प्रकरणातील न्यायालयीन कामकाजात दिवसभर व्यस्त होते. मात्र, खासदार संजय जाधव, संजय देशमुख, बाबासाहेब वाकचौरे आणि नागेश अष्टिकर हे रात्री उशिरापर्यंत संपर्काबाहेर होते.

– हे चार खासदार दिल्लीत

संजय जाधव (परभणी)
संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम)
भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)
नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)

हे खासदारही फुटण्याच्या मार्गावर

ओमराजे निंबाळकर (धाराशिव)
राजाभाऊ वाझे (नाशिक)
संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई)