दिल्लीत सांभाळणार जबाबदारी : या मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा!

दिल्लीत सांभाळणार जबाबदारी : या मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा!

-म्हणाले, एक दिवस मी परत मुख्यमंत्री होणार

प्रतिनिधी
बिहार : नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा मंगळवारी राजीनामा दिला आहे. नितीश कुमार हे राज्यसभेवर निवडून गेले आहेत. तब्बल २० वर्षे बिहारचे मुख्यमंत्री पद नितीशकुमार यांनी सांभाळले. आता बिहारची सुत्रे सोडून नितीश कुमार दिल्लीत जाणार आहेत. सर्वाधिक काळ बिहारचा मुख्यमंत्री राहण्याचा मान त्यांनी मिळवला. १९७७ च्या विधानसभा निवडणुकीत हरनौत मतदारसंघातून पराभूत झालेले नितीश कुमार पाटण्यातील एका कॉफी हाऊसमध्ये पत्रकारांशी गप्पा मारत बसले होते. गप्पा मारताना गंभीर विषयांवर चर्चा सुरू झाली. नितीश कुमार यांनी आवेगात टेबलवर थाप देत एक दिवस मी मुख्यमंत्री होणार असे सांगून टाकले. त्यांच्या कारकिर्दीचा हा विशेष आढावा.

जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून १९७४ मध्ये नितीश कुमार पुढे आले. त्यानंतर त्यांनी त्यांचे सोबती असलेले लालू प्रसाद यादव अवघ्या २९ व्या वर्षी खासदार झाल्याचे पाहिले. तसेच प्रसिद्धीच्या झोतात नसलेले मिथिलेश कुमार सिंह हे आमदार झालेले पाहिले. १९७२ मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदवी घेतलेल्या नितीश कुमार यांनी पूर्णवेळ राजकारणात पडण्याचा निर्णय घेतला. १९८५ पर्यंत पराभवाने नितीश कुमार यांची साथ सोडली नाही. अखेर १९८५ मध्ये ते हरनौतमधून आमदार झाले. परंतु, तोपर्यंत समाजवादी नेत्यांच्या दुसऱ्या फळीतील लालू प्रसाद यादव यांनी बिहारच्या राजकारणात जम बसवला होता. १९९० ते २००५ पर्यंत बिहारच्या राजकारणावर लालूंचा प्रभाव होता. याच पंधरा वर्षांत नितीश कुमार यांनी सात दिवसांचे मुख्यमंत्रीपद मिळवले. ही त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीसाठी गरूडझेप ठरली. बिहारच्या राजकारणात लालूंचा प्रभाव होता. त्यामुळे स्वत:चे राजकीय महत्व कायम ठेवण्यासाठी नितीश कुमार यांनी दिल्लीत वेळ व्यतीत केला.

नितीश कुमार यांनी आज (मंगळवार) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन २० वर्षांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द संपवली. सर्वाधिक काळ बिहारचा मुख्यमंत्री राहण्याचा मान त्यांनी मिळवला. आता नितीश कुमार हे डॉ. श्रीकृष्ण सिंह, कर्पुरी ठाकुर आणि लालू प्रसाद यादव यांच्या पंगतीत जाऊन बसले आहेत. सिंह यांना अनेकदा “आधुनिक बिहारचे जनक” म्हटले जाते. त्यांनी बिहारमध्ये कारखाने आणि शैक्षणिक संस्था आणल्या. कर्पुरी ठाकुर हे सामाजिक न्यायासाठी ओळखले जातात. ओबीसी, इबीसी आणि अनुसूचित जातींचे सशक्तीकरण करण्याचे काम त्यांनी केले. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांनी कर्पुरी ठाकूर यांच्या सामाजिक न्यायाचे मॉडेल पुढे नेल्याचे म्हटले जाते. लालूंच्या काळात काँग्रेसमधील उच्चवर्णीयांकडून सत्ता ओबीसींच्या हातात गेली. ओबीसी राजकारण आजही बिहारमध्ये प्रभावी ठरते, त्याचे श्रेय लालूंना दिले जाते. आता प्रश्न असा की, दीर्घकाळ बिहारचे मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमारांना बिहारमध्ये कसे ओळखले जाईल? पुढील पाच गोष्टींसाठी नितीश यांना बिहार लक्षात ठेवू शकतो.

पायाभूत सुविधांसाठी (इन्फ्रास्ट्रक्चर मॅन)
खड्ड्यांचे साम्राज्य असलेले रस्ते आणि मोडकळीस आलेल्या शाळा व रूग्णालयाच्या इमारतींसाठी बिहार ओळखले जात. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात २००५ ते २०१० दरम्यान रस्ते व पूल उभारण्यावर भर दिला. तर दुसऱ्या कार्यकाळात २०१० ते १०१५ दरम्यान शाळा, रूग्णालये आणि सरकारी कार्यालये बांधण्यावर जोर दिला. त्यांनी बिहारमध्ये काही वास्तू उभारल्या, जसे की बिहार म्युझियम, सम्राट कन्व्हेंशन सेंटर, सरदार पटेल भवन (बिहार पोलिसांचे मुख्यालय) आणि बापू टॉवर.

दरम्यान, नितीश कुमार हे विटांचे बांधकाम करण्यात अडकल्याची टीका केली जाते. नितीश कुमार शाळा बांधण्यात यशस्वी झाले, पण उत्कृष्ट शैक्षणिक संस्था निर्माण करण्यासाठी त्यांचे प्रयत्न कमी पडले. त्यांनी चांगली रूग्णालये बांधली, पण तिथे डॉक्टरांची संख्या समाधानकारक ठेवण्यात ते अपयशी झाले. त्यांनी आर्यभट्ट ज्ञान विद्यापीठ आणि चाणक्य विधी विद्यापीठाची स्थापना केली. तसेच सिमूलतला (जमुई) शाळा उभारल्या. पटना वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात एकेकाळी चंद्रशेखर यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी शस्त्रक्रिया केली होती. पण आज नितीश कुमार स्वत: व इतर बिहारी राजकीय नेते उपचारांसाठी दिल्लीत पळतात. बिहार सरकारच्या रूग्णालयांमध्ये उपचार घेण्यापेक्षा दिल्लीत जाणे त्यांना सोईस्कर वाटते.