आज या ठिकाणी आहे मतदान : सुनेत्रा पवारांनी या केंद्रात बजाविला हक्क
-महाराष्ट्रात या ठिकाणी सुरू आहे मतदान
प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकीकडे देशात SIR मुळे प्रचंड चर्चा झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा पहिला टप्पा तर अभिनेता विजयच्या आव्हानामुळे चर्चेत आलेल्या तामिळनाडू विधानसभेसाठी आज मतदान पार पडत आहे. त्याचवेळी दुसरीकडे महाराष्ट्रात प्रचंड चर्चा झालेल्या दोन पोटनिवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. त्यात अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेला बारामती विधानसभा मतदारसंघ व भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सकाळी ७ वाजता या सर्व ठिकाणी रीतसर मतदानाला सुरुवात झाली. मतदानानंतर बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली.
-सुनेत्रा पवार म्हणाल्या…!
आज सकाळी सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या काटेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्या अजित पवार यांच्या आठवणींनी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. “सगळ्याच बाजूने ही अत्यंत भावनिक निवडणूक आहे. अजित दादांशिवाय कोणत्याही गोष्टी करण्याची सवय आपल्याला नाहीये. पण आज आपण हे मानून चालायला हवं की दादा आता आपल्यात नाहीत. सगळ्याच बारामतीकरांनी हे लक्षात घेतलं आहे आणि ते मतदानाला बाहेर पडत आहेत. बारामतीची जनता आज कर्तव्य म्हणून मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडताना दिसत आहे. बारामतीची जनता आजचं मतदान अजितदादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्षं केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहे”, असं त्या म्हणाल्या.


