नागपुरात काँग्रेसच्या सृजन अभियानातून नेमके काय साध्य झाले?

नागपुरात काँग्रेसच्या सृजन अभियानातून नेमके काय साध्य झाले?

-पदोपदी घडले सत्तासंघर्षाचे दर्शन

प्रतिनिधी
नागपूर : दिल्लीहून अध्यक्ष लादण्याची परंपरा असलेल्या काँग्रेसमध्ये आता पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून शहर व ग्रामीण अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याला ‘ सृजन अभियान’ असे नाव देण्यात आले आहे. नवीन नेतृत्वाचा शोध, संघटना बांधणी आणि पक्ष विस्तार हा या अभियानाचा उद्देश. नागपूर जिल्ह्यात नुकतेच हे अभियान पूर्ण झाले. यात जे गटबाजी, केद्रीकरणाचे सत्तासंघर्षाचे दर्शन घडले त्यावरून हे ‘सृजन’ आहे की संघर्ष असा प्रश्न पडावा.

‘संघटन सृजन’ म्हणजे केवळ पदांची पुनर्नियुक्ती नव्हे, तर विश्वास, समन्वय आणि नेतृत्व यांची नव्याने उभारणी, असे काँग्रेस नेतृत्वाला अपेक्षित असताना नागपूर जिल्ह्यात अगदी या उलट स्थिती असल्याचे नेते, कार्यकर्त्यांच्या वागणुकीतून दिसून आले.

कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर जिल्ह्यात हा पक्ष सध्या अस्तित्वासाठी संघर्ष करतो आहे. .शहर असो किंवा ग्रामीण दोन्ही ठिकाणी पक्षात प्रचंड मोठ्या प्रमाणात गटबाजी आहे, अनेक गटात पक्ष कार्यकर्ते विभागले गेले आहेत. जिल्ह्यात आपल्या म्हणण्या प्रमाणेच पक्ष चालावा, अशी सुनील केदार यांची अपेक्षा आहे तर शहर काँग्रेसमध्ये मी म्हणेल ती पूर्व दिशा अशी भूमिका विद्यमान शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांची आहे, अशीच भूमिका आमदार नितीन राऊत यांची त्यांच्या उत्तर नागपूर मतदारसंघाच्या बाबतीत आहे.

अन्य मतदारसंघात प्रभावी नेतृत्व पुढे आले नाही. तेच ते चेहरे आहेत, पक्ष वाढवण्याऐवजी आपला गट कसा मजबूत राहिल याकडेच नेत्यांचे लक्ष आहे, पक्षाची पिच्छेहाट झाल्याचे नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत दिसून आले. १५१ पैकी फक्त ४६ जागा पक्षाला जिंकता आल्या. दुसरीकडे भाजप पैसा आणि सत्ता या जोरावर जिल्ह्यावर पकड अधिक मजबूत करीत आहे. या पक्षापुढे टिकाव धरायचा असेल तर संघर्षशील नेतृत्वाची गरज आहे.

या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात सृजन अभियानाच्या माध्यमातून शहर आणि ग्रामीण अध्यक्ष निवडण्यात येणार आहे. सर्वांशी चर्चा करून ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्राने आणि राज्याने नियुक्त केलेले निरीक्षक पाच दिवस नागपूरमध्ये फिरले, नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी बोलले, चर्चा केली. ही प्रक्रिया पार पाडताना जी वादावादी, संघर्ष घडले त्यावरून ते सृजन होते की संघर्ष ? असा प्रश्न पडतो. रविभवनमध्ये निरीक्षकांना भेटू दिले नाही, त्यासाठी कार्यकर्त्यांच्या दोन गटात संघर्ष झाला. निष्ठावान कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी ज्या निरीक्षकांवर होती त्यांचे महापालिका निवडणुकीत पक्षाविरुद्ध बंडखोरी करणाऱ्यांसोबत मेजवानी करतानाचे व्हीडीओ व्हायरल झाले. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या बैठकीतही दोन गटात धक्काबुक्की झाली. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार नितीन राऊत आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये जुंपली.