सत्ता कुणाची? ते १११ विधानसभा मतदार संघ ठरेल भाजपासाठी किंगमेकर!

सत्ता कुणाची? ते १११ विधानसभा मतदार संघ ठरेल भाजपासाठी किंगमेकर!

-हे आहे ममता बॅनर्जी यांच्या विजयाचे गणित

प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. २३ एप्रिल व २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहे. पश्चिम बंगालमधील प्रेसिडेन्सी विभाग हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या विभागात विधानसभेचे एकूण १११ मतदारसंघ आहेत. भाजपाने तृणमूल काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. ममता बॅनर्जींच्या गडाला सुरूंग लावून सत्तेत येण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. प्रेसिडेन्सी विभागात ममता बॅनर्जींचे वर्चस्व कसे आहे? हा विभाग ममता बॅनर्जींसाठी सत्तेचा मार्ग कसा मोकळा करतो.

प्रेसिडेन्सी विभाग हा पश्चिम बंगालमधील पाच प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. या विभागात उत्तर कोलकाता, दक्षिण कोलकाता, हावडा, नादिया, उत्तर २४ परगणा आणि दक्षिण २४ परगणा या महत्वाच्या जिल्ह्यांचा समावेश होतो. २०११ मध्ये पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पहिल्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर या विभागातील मतदारसंघांवरील पकड मजबूत केली आहे. उत्तर आणि दक्षिण कोलकात्यामध्ये विधानसभेच्या एकूण १४ जागा आहेत. तर हावडा जिल्ह्यात १६, नादियामध्ये १७, उत्तर २४ परगणामध्ये ३३ आणि दक्षिण २४ परगणामध्ये ३१ जागा आहेत.

माकपचे वर्चस्व टीएमसीने संपवले

२००६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने प्रेसिडेन्सी विभागातील विधानसभेच्या एकूण १११ जागांपैकी ७२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये २०११ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आघाडीने प्रेसिडेन्सी विभागातील विधानसभेच्या ८९ जागांवर विजय मिळवला. माकपचे या भागातील वर्चस्व संपवले. त्यानंतर २०१६ व २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने प्रेसडेन्सी विभागात १११ पैकी अनुक्रमे ९१ व ९६ जागा जिंकल्या. दरम्यान, २०२१ मध्ये भाजपाने पश्चिम बंगालमध्ये मोठी मजल मारत प्रमुख विरोधी पक्ष होण्याची किमया साधली. भाजपाने विधानसभेच्या ७७ जागा जिंकल्या होत्या.

प्रेसिडेन्सी विभाग आणि मुख्यमंत्री
प्रेसिडेन्सी विभाग हा पश्चिम बंगालच्या राजकारणात सर्वात महत्वाचा मानला जातो. याच विभागातून पश्चिम बंगालच्या पाच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. माकपचे (सीपीआय – एम) ज्योती बसू यांनी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बरानगर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी सातगाछिया मतदारसंघातून निवडणूक लढवली. ज्योती बसू यांनी सलग पाचवेळा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री पद सांभाळले. माकप (सीपीआय-एम) चेच बुद्धदेव भट्टाचार्य यांनी देखील याच विभागातील मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी दोन वेळा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री पद सांभाळले.

-ही आहे टीएमसीची व्होट बँक

पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०११, २०१६ आणि २०२१ च्या पोटनिवडणुकीत कोलकात्याच्या भवानीपूर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. प्रेसिडेन्सी विभागातील हावडा, उत्तर आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक समुदाय मोठ्या संख्येने आहे. या समुदायाला ममता बॅनर्जींच्या टीएमसी पक्षाची व्होट बँक मानले जाते. “प्रेसिडेन्सी विभागातील १११ जागांवर आमचा विजय होणार हे निश्चित आहे. गेल्या काही वर्षांपासून आम्ही या भागांत तसेच संपूर्ण बंगालमध्ये आमची स्थिती मजबूत केली आहे. हा आमचा सर्वात भक्कम बालेकिल्ला आहे. त्यामुळे भाजपा पश्चिम बंगालमध्ये आम्हाला पराभूत करण्याचा विचार तरी कसा करू शकतो?”, असा सवाल टीएमसीच्या एका वरीष्ठ नेत्याने उपस्थित केला आहे.