शिंदेचे कार्यकर्ते बावचळले; ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिरून मारहाण

शिंदेचे कार्यकर्ते बावचळले; ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिरून मारहाण

-खासदार राजन विचारेंना धक्काबुक्की

प्रतिनिधी
ठाणे : शिवसेनेतील फुटीनंतर ठाण्यातील राजकीय संघर्ष आता हिंसक होताना दिसत आहे. काल ठाण्यातील किसननगर येथे उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी घुसखोरी करत ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.

घटनास्थळी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेही उपस्थित होते. यावेळी त्यांनाही धक्काबुक्की झाल्याचे दिसत आहे. पोलिसांनी धाव घेत त्यांना घटनास्थळावरून बाहेर काढले. ही मारहाण कॅमेऱ्यांतही कैद झाली आहे.

काल मध्यरात्री ही घटना घडली. शिंदे गटाचे कार्यकर्ते योगेश जानकर व इतरांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. घटना घडली त्या किसन नगर परिसरात मुख्यमंत्री शिंदे यांचे प्राबल्य आहे.

-कार्यकर्ता रुग्णालयात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत कार्यकर्ता जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर दोन्ही गट येथीळ श्रीनगर पोलिस स्टेशनसमोरही आमने-सामने आले.

-दोन्ही गट आमने-सामने

मारहाणीनंतर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार देण्यासाठी श्रीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, तेथे शिंदे गटाचेही कार्यकर्ते दाखल झाल्याने पुन्हा दोन्ही गट आमने-सामने आले. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून राजन विचारे, केदार दिघे आणि ठाकरे गटाच्या इतर नेत्यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.

-पोलीस ठाण्याला घेरावचा प्रयत्न

ठाकरे गटाचे नेते श्रीनगर पोलिस ठाण्यात असतानाच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाहेर जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे परिस्थिती चिघळू नये, यासाठी पोलिसांनी खासदार राजन विचारेंसह ठाकरे गटाच्या नेत्यांना कडेकोट बंदोबस्तात बाहेर काढले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्जही करण्यात आला.