विजयाच्या उंबरठ्यावर: ऋतुजा लटकेंना मिळणार सर्वाधिक मते

विजयाच्या उंबरठ्यावर: ऋतुजा लटकेंना मिळणार सर्वाधिक मते

-अंधेरी पोटनिवडणूक

प्रतिनिधी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज रविवारी जाहीर होत आहे. या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके किती मताधिक्य घेऊन विजयी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना ९० ते ९५ टक्के मते मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. राज्यातील सत्तांतरानंतर मुंबईत होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेला आपले वर्चस्व दाखवून द्यायचे असल्यास ऋतुजा लटके यांनी मोठा विजय मिळवणे आवश्यक आहे.

मतदारांनी दाखवलेल्या निरुउत्साहामुळे या पोटनिवडणुकीत अवघे ३१.७४ टक्के इतके मतदान झाले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व मतदारसंघात एकूण २,७१,००० मतदार आहेत. मात्र, यापैकी फक्त ३१.७४ टक्के म्हणजे ८५,६९८ नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे निकालाच्या दिवशी नेमके कसे चित्र पाहायला मिळणार, याविषयीचा संभ्रम अधिक वाढला होता.

-नोटाचा अधिक वापर झाल्याचा आरोप

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपच्या मुरजी पटेल यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली होती. त्यामुळे ही पोटनिवडणूक एकतर्फी झाली होती. यामध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात आहे. परंतु, मतदानाच्या काही दिवस आधी भाजपकडून पडद्यामागून ‘नोटा’चा प्रचार केला जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून (ठाकरे गट) करण्यात आला होता. ऋतुजा लटके यांच्यापेक्षा नोटा या पर्यायाला जास्त मतं पडावीत, यासाठी पद्धतशीर आखणी केली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे होते. आता या पोटनिवडणुकीत अगोदरच अवघे ३१ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये आता नोटाला किती मतं पडणार, हे पाहणे औत्स्युकाचे असेल.