विचारले हे प्रश्न: मुख्यमंत्री हिरमुसले, चिमकुल्यांचा भलताच ‘क्लास’
-बालकदिनी शिंदेनी दिली बिनधास्त उत्तरे
प्रतिनिधी
परळ : परळच्या क्षा.म.स. संस्थेच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना आज बालदिनाची अनोखी भेट मिळाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्षात शाळेत आले. त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या. त्यांच्या मनातल्या प्रश्नांना थेट उत्तरे देताना मी याठिकाणी मुख्यमंत्री म्हणून नाही तर तुमच्यातलाच एक होऊन शाळेच्या आठवणी जागवायला आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एकंदरीतच सुमारे तासभर चाललेल्या या बालदिनाच्या अनोख्या सोहळ्यात मुख्यमंत्री मुलांसोबत रमले. त्यांच्यासोबत सेल्फी घेताना तेही त्यांच्यातलेच एक होऊन गेले.
बालदिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, एक विद्यार्थी म्हणून मी आज इथे माझ्या शाळेतल्या आठवणी जागवायला आलो आहे. बालपण महत्वाचं असून त्यातला निरागसपणा सर्वांनी जपावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मोठे झाल्यावर जबाबदाऱ्या येतात त्यामुळे लहानपण देगा देवा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. अभ्यास करताना दडपण घेऊ नका असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला.
-बिनधास्त बोलले शिंदे
मुख्यमंत्री शिंदे यांना मुलांनी बिनधास्तपणे मनातले प्रश्न विचारले. त्यांनीही तितक्याच मोकळेपणाने उत्तरे देखील दिली. एका विद्यार्थीने मुख्यमंत्र्यांना आई-बाबांचा, शिक्षकांच्या हातचा मार खाल्ला का? असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री हसले आणि त्यांनी ठाण्यातील किसननगर मधील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मधील आठवणी सांगितल्या. रघुनाथ परब नावाचे शिक्षक कसे शिक्षा करायचे याचा अनुभव सांगतानाच लहानपणापासून दुसऱ्याला मदत करण्याची आवड होती. समाजकारणातून राजकारणात आल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
पांढऱ्या रंगाचे कपडेच का घालतात, दाढी का ठेवतात, शिक्षकांचा मार खाल्ला होता का? मुलांनी विचारलेल्या या भन्नाट प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी खुमासदार उत्तरे दिली. परळच्या डॉ. बोर्जेस रस्त्यावरील डॉ. शिरोडकर विद्यालयाच्या सभागृहात केजीपासून ते माध्यमिक वर्गापर्यंतचे विद्यार्थी जमले होते. निमित्त होते बालदिनाचे. मुख्यमंत्री सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास शाळेत आले. चिमुकल्यांनी स्वत: तयार केलेल्या शुभेच्छापत्रे, गुलाबाच्या फुलांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.


