मनोज जरांगे ऍक्टिव मोडमध्ये : राज्यभर का करताहेत दौरा ?
– ११ जिल्ह्यात जाऊन साधणार संवाद
प्रतिनिधी
मराठवाडा : मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र व आरक्षण मिळण्यासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील आज शनिवारपासून राज्याचा दौरा करणार आहेत. ३० सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या १२ दिवसांच्या पहिल्या टप्प्यात ११जिल्ह्यांतील ८७ गावांमध्ये जाऊन जरांगे पाटील मराठा समाजाशी संवाद साधतील. ५ हजार किमीहून अधिक प्रवास ते करणार आहेत. यावेळी त्यांच्यासाेबत कायम २०० कार्यकर्ते व २५ वाहनांचा ताफा असेल. प्रत्येक जिल्ह्यात वाहने व कार्यकर्त्यांची संख्या वाढेल, अशी माहिती छावाचे अध्यक्ष गंगाधर काळकुटे यांनी दिली.
सरकारने मागितलेली वेळ १४ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. यादिवशी आंतरवाली येथे १०० एकरांवर भव्य मेळावा घेतला जाईल. त्यासाठी आज शनिवारपासून ११ ऑक्टोबरपर्यंत हा दौरा होणार आहे. जालना, हिंगोली,नांदेड, यवतमाळ, परभणी, बीड,लातूर, धाराशिव, सोलापूर,अहमदनगर या १० जिल्ह्यांत हा पहिला टप्पा होणार आहे. १४ ते २३ऑक्टोबर या दरम्यान दुसरा टप्पा होईल. २४ ऑक्टोबर ही आरक्षण देण्याची अंतिम मुदत असून त्यानंतर भूमिका ठरवू, असे जरांगे म्हणाले. ३० सप्टेंबर रोजी पहिल्या दिवशी आंतरवाली सराटी,अंबड, घनसावंगी, कुंभारपिंपळगाव, परतूर, मंठा, जिंतूर, हिंगोली या गावातून जरांगे दौरा करणार आहेत.


