पुण्यात नितेश राणेविरोधात का छेडले
तृतीयपंथीयांनी आंदोलन ?
-तृतीयपंथीयांनी केला रास्ताराेकाेचा प्रयत्न
प्रतिनिधी
पुणे : तृतीयपंथीयांविषयी केलेल्या आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी सत्ताधारी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी तृतीयपंथीयांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यासमोर मंगळवार रात्रीपासून आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. पण तृतीयपंथीय आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने पोलिसाचा प्रयत्न उधळला गेला. या प्रकरणी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, तृतीयपंथीयांनी रास्ता राेकाेचा प्रयत्न केला केला. पाेलिसांनी बळाचा वापर करुन त्यांना तेथून हलवण्याचा प्रयत्न केला असता त्यांची त्यांच्यासोबत झटापट झाली. यामुळे तणाव निर्माण झाला. आम्ही भारताचे नागरिक असून नितेश राणे यांनी आमच्या जेंडरवरुन शिवीगाळ केली. न्याय मागणे आमचा अधिकार असून, तो आम्ही मागत आहोत. या प्रकरणी नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी आंदोलक तृतीयपंथीयांनी यावेळी केली. यावेळी काही आंदोलकांनी पोलिसांवर राजकीय दबावाला बळी पडत तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचाही आरोप केला.
काय म्हणाले आंदोलक?
नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी वादातून हिजडा शब्दाचा शिवी म्हणून वापर केला. हिजडा या शब्दाला सांस्कृतिक व सामाजिक ओळख आहे. न्यायालयानेही ट्रान्सजेंडर कायदा मान्य केल्यामुळे आम्हाला सन्मानाने जीवन जगू शकताे. हिजडा म्हणून आम्ही जगायचे कसे? पाेलिसांनी आम्हाला फरफटत नेत धक्काबुक्की केली. त्यामुळे बंडगार्डन पाेलिसांवर कारवाई करण्यात यावी, असे ते म्हणाले.


