मुख्यमंत्री का म्हणाले, बौद्धिक नक्षलवाद अधिक धोकादायक
-गडचिरोलीत जनजाती कार्यक्रमात भाष्य
प्रतिनिधी
गडचिरोली : बंदुकीच्या जोरावर चालणाऱ्या सशस्त्र नक्षलवादापेक्षा समाजात वैचारिक पातळीवर रुजत असलेला बौद्धिक नक्षलवाद अधिक धोकादायक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देशाचे संविधान आणि प्रस्थापित व्यवस्था नाकारणारी नवी पिढी घडविण्याचा प्रयत्न या विचारधारेतून होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त येथे आयोजित जनजातीय गौरव दिनाच्या मुख्य सोहळ्यानिमित्त गडचिरोलीला आले असताना ते माध्यमांशी बोलत होते.
सशस्त्र नक्षलवादाचा प्रभाव कमी होत असताना वैचारिक पातळीवरील आव्हानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. अशा प्रवृत्तींना प्रत्युत्तर देताना संविधानाच्या चौकटीतच लढा द्यावा लागेल. देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय आणि समान संधी देण्याची क्षमता संविधानात आहे, हे सातत्याने समाजासमोर मांडण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील बदलते चित्र देशभर पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करण्यावरही फडणवीस यांनी भर दिला. देशाच्या विविध भागांतील कंटेंट क्रिएटर्स, लेखक आणि समाजमाध्यम प्रभावक गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी येथील परिवर्तनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचे त्यांनी सांगितले. नक्षलवादमुक्तीच्या प्रक्रियेनंतर जिल्ह्यात होत असलेली प्रगती, विकासकामे आणि बदललेली सामाजिक परिस्थिती या प्रतिनिधींनी जवळून पाहिल्याचे ते म्हणाले.
या दौऱ्यात केवळ पर्यटनस्थळे आणि निसर्गसंपदेची ओळख करून देण्यात आली नाही, तर आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी आणि नक्षलग्रस्त कुटुंबांशीही या प्रतिनिधींनी संवाद साधला. जिल्ह्यातील उद्योग, खाणकाम, कौशल्य विकासाचे उपक्रम आणि निसर्गसंपदा यांची माहितीही त्यांनी घेतली. या अनुभवांच्या आधारे समाजमाध्यम प्रभावक गडचिरोलीचे बदलते चित्र देशभरातील नागरिकांपर्यंत पोहोचवतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
नक्षलवादाची ओळख असलेल्या गडचिरोलीची विकासाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत असून जिल्ह्यातील विकासप्रक्रिया आणि वैचारिक आव्हाने या दोन्ही मुद्द्यांवर त्यांनी यावेळी भाष्य केले.


