हा बडा नेता म्हणाला, भाजपा शिंदेसेनेचे ऑपरेशन करणार
-अमित शाहांवर केला हल्लाबोल
प्रतिनिधी
मुंबई : ऑपरेशन टायगर ३.० नक्की होणार’, असा दावा शिंदेसेनेचे मंत्री संजय सिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला होता. भाजपाच एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन करणार, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली. देशाला चकाट्या पिटणारा गृहमंत्री लाभला असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांवर हल्लाबोल केला. आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात दुष्काळ पडलाय, त्यांना मदत करा, राजकारण करू नका, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी रोहित पवारांना लक्ष्य केले.
राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली असून ठाकरे गटाचे काही आमदार फुटणार असल्याचा दावा केला जात आहे. ‘ऑपरेशन टायगर’ नक्की होणार, पण त्याची तारीख आणि वेळ यथावकाश सांगू असे सूचक वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले होते. त्यांच्या सुरात सूर मिसळून मंत्री संजय शिरसाट यांनीही ऑपरेशन टायगरबाबत भाष्य केले आहे. पक्षात कार्यकर्त्यांना योग्य वागणूक मिळत नसेल, त्यांचे म्हणणे ऐकले जात नसेल, तर ते पक्षात का राहतील, असा सवाल शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधताना उपस्थित केला. कार्यकर्ते पक्षातील परिस्थितीला कंटाळून बाहेर पडतात आणि अशा वेळी एकत्र येऊन उठाव करतात. पक्षाचे भवितव्य चांगलं नसल्याची भावना निर्माण झाल्यानंतरच अशा प्रकारचे ‘ऑपरेशन टायगर’ घडते, असं सांगत शिरसाट यांनी ‘ऑपरेशन टायगर ३.० नक्की होणार’ असल्याचे सांगितले. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
–उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
देशाला चकाट्या पिटणारा गृहमंत्री लाभला असल्याचे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांवर हल्लाबोल केला. १६ नोव्हेंबर रोजी अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी शाह यांनी करोना काळात अजित पवार माझा फोन उचलायचे, पण त्यावेळचे मुख्यमंत्री फोन उचलत नसत असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर प्रश्न विचारला असता अमित शाह म्हणजे चकाट्या पिटणारा गृहमंत्री असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तसेच अजित पवार हयात असताना त्यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या अमित शाह यांनी आता त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यापूर्वी माफी मागायला हवी होती, अशी टीकाही ठाकरे यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेला आता भाजपाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
–रोहित पवारांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. मी रोहित यांची पत्रकार परिषद पाहिली नाही. पत्रकार परिषद सुरू असताना मी विमानात होते. मी वर्तमान पत्रात ती बातमी वाचली. मला वाटते की आस्थेचा आणि प्रेमाचा एक विषय असतो. रोहितचे आणि दादाचे एक प्रेमाचे आणि आपुलकीचे नाते होते. त्यामुळेच रोहितची अस्वस्थता आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे त्याला अपेक्षित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अमित शाह जे आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे जाहीर मागणी केली आहे की जो अहवाल आहे तो लवकर समोर यावा, अशी अपेक्षा असल्याचे सुप्रिया यांनी म्हटले आहे. तसेच अजित पवार यांच्या विमान अपघाताचे सत्य बाहेर आलेच पाहिजे, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. १६ नोव्हेंबरला आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊत मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
-“भाजपाच शिंदेंचे ऑपरेशन करणार”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय ऑपरेशन होण्याची वेळ आली आहे. भाजपाच शिंदे यांचे ऑपरेशन करणार, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना दानवे यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सत्ताधाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली असून ठाकरे गटाचे काही आमदार फुटणार असल्याचा दावा केला जात आहे. शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनी त्याबाबतचे संकेतही दिले आहेत. ठाकरे गटाने मात्र आमदारांच्या पक्षांतराच्या चर्चांना ठामपणे नाकारले आहे. या केवळ निराधार अफवा आणि मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी सुरू केलेले राजकारण असल्याची टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. दरम्यान भाजपाच शिंदे यांचे ऑपरेशन करणार, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.


