तुकाराम मुंडेची या कारणासाठी सुरू झालीयं देशभरात चर्चा

तुकाराम मुंडेची या कारणासाठी सुरू झालीयं देशभरात चर्चा

-म्हणाले, मी माझी भूमिका जगतो

प्रतिनिधी
मुंबई : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून राज्यभरात भेसळखोरांच्या विरोधात धडक कारवाया सुरू आहेत. तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात कारवायांचा धडाका लावल्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढेंच्या या धडाकेबाज कामाची फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात मोठी चर्चा सुरू आहे.

तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने आतापर्यंत भेसळयुक्त पनीर, भेसळयुक्त दूध, रेस्टॉरंट्स, हॉटेलवरील निकृष्ट दर्जाचं जेवण, शैक्षणिक संस्थांमधील खाणावळी, कॅन्टीन अशा अनेक ठिकाणी कारवाया केल्या आहेत.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी आतापर्यंत अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध विषयांवर देखील भूमिका मांडलेली आहे. आता रविवारी (२२ नोव्हेंबर) तुकाराम मुंढे यांनी पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थ्याने तुकाराम मुंढे यांना थेट मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेबाबत प्रश्न विचारला. यावर तुकाराम मुंढे यांनी देखील मोठं भाष्य केलं आहे.

तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? किंवा तुमची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला. यावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “आता तुमचा जो प्रश्न आहे की मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? यावर माझ्या आधीच सर्वांनी वेगळा अर्थ काढून घेतला आहे. मला जर तुम्ही १० वर्षांआधीच म्हणजे २०१६ ला तेव्हा सोलापूर जिल्हाधिकारी पदावरून माझी बदली झाली होती मुंबईत. जर तेव्हा मला विचारलं असतं की तुम्ही एफडीएचे आयुक्त होणार का? तर मी काय सांगू शकलो असतो? माहिती नाही असं म्हणलो असतो किंवा मला तेव्हा कोणी विचारलं असतं तर माहिती नाही असंच उत्तर मी दिलं असतं. कारण मला तेव्हा एफडीए आयुक्त काय आहे हे माहिती नव्हतं, कारण तेव्हा मी त्याबाबत जास्त अभ्यास केला नव्हता. एफडीए आयुक्त असतात, ते काम करतात एवढं माहिती होतं. पण एवढही सविस्तर माहिती नव्हती.” असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं.

“त्यामुळे मला हे व्हायला आवडेल का? हे झालं ‘विश लिस्ट’चा भाग आणि मी ‘विश लिस्ट’वर राहत नाही. मला वास्तवात राहायला जास्त आवडतं आणि वास्तव हे आहे की मी आहे पब्लिक सर्व्हंट. त्यामुळे पब्लिक सर्व्हंट असताना मी फक्त माझा जॉब करत नाही, तर मी माझी भूमिका जगतो. प्रत्येकाने देखील हे समजून घेतलं पाहिजे की तुम्ही जॉब करत असताना तुमची भूमिका समजून घ्या आणि भूमिका जगा. त्यामुळे पब्लिक सर्व्हंट म्हणून मी देखील ती भूमिका जगण्याचा प्रयत्न करत आहे.” असं उत्तर तुकाराम मुंढे यांनी दिले.