काय आहे भानगड? नव्या समीकरणामुळे बिघडणार काँग्रेसचे गणित

काय आहे भानगड? नव्या समीकरणामुळे बिघडणार काँग्रेसचे गणित

– ‘सामाजिक परिवर्तन मोर्चा’ चे आव्हान

प्रतिनिधी
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या राजकारणातील नव्या युतीमुळे निवडणुकीत रंगत येणार आहे. दलित आणि मुस्लिम मतदारांना एकत्र आणून राज्यात तिसरा राजकीय पर्याय उभा राहणार आहे. ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) आणि चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टी (कांशीराम) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युती केली आहे. या युतीला ‘सामाजिक परिवर्तन मोर्चा’ असं नाव देण्यात आलं आहे. तर चंद्रशेखर आझाद यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यात आले आहे.

चंद्रशेखर आझाद हे सध्या नगीना मतदारसंघाचे खासदार आहेत. आझाद यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा केल्यामुळे दलित मतदारांचा विश्वास जिंकता येईल, असा आझाद समाज पार्टीच्या नेत्याचा दावा आहे. उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येत दलित समाजाचा सुमारे २१ टक्के वाटा आहे, तर मुस्लिम समाजाचा १९ टक्के वाटा आहे. या दोन्ही समाजांची मोट बांधल्यास आपल्याला राजकीय परिवर्तन घडवता येऊ शकते, असेही युतीतील नेत्यांचे म्हणणे आहे.

युतीची घोषणा होण्याआधीच दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार उत्तर प्रदेश विधानसभेच्या मैदानात उतरवले. ओवैसींच्या AIMIM पक्षाने बहराइच जिल्ह्यातील मटेरा मतदारसंघातून शौकत अली, शामली जिल्ह्यातील कैराना येथून इंजिनिअर इरफान आणि श्रावस्ती जिल्ह्यातील भिनगा मतदारसंघातून दद्दन खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, आझाद समाज पार्टीने आतापर्यंत ८७ विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

राज्यातील तिसऱ्या मोठ्या युतीमुळे भाजपासोबतच समाजवादी पार्टी-काँग्रेस युती आणि बहुजन समाज पार्टीच्या यांच्यासमोर आव्हान उभे राहू शकते. दलित आणि मुस्लिम मतदारांची एकजूट झाली, त्याला ओबीसी आणि ब्राह्मण समाजाची साथ मिळाली, तर २००७ मध्ये मायावती यांच्या नेतृत्वाखाली बीएसपीने उभारलेल्या सामाजिक समीकरणांची पुनरावृत्ती होऊ शकते, असा एआयएमआयएम आणि आझाद समाज पार्टीच्या नेत्यांचा दावा आहे.

दलित-मुस्लिम समाजांची बहुतांश मतं एकत्र आली, तर ओबीसी मतदारांचाही पाठिंबा मिळू शकतो आणि त्यातून सत्तेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे एका एआयएमआयएमच्या नेत्याने म्हटले आहे. मात्र, अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही, तरी या आघाडीमुळे समाजवादी पार्टी-काँग्रेस युती आणि बीएसपीच्या मते काही प्रमाणात आपल्याकडे वळू शकतात, हा त्या युतीसाठी राजकीय धक्का असू शकतो, असेही या नेत्याने म्हटले.

दरम्यान, समाजवादी पार्टीने या नव्या आघाडीचा फारसा प्रभाव पडणार नसल्याचे म्हटलं आहे. पक्षाचे प्रवक्ते फैजान किदवाई यांच्या मते, सर्व समाजघटकांनी अखिलेश यादव यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाची सत्ता संपवायची असेल, तर अखिलेश यादव यांच्याशिवाय दुसरा पर्याय मतदारांना दिसत नाही, असा दावाही त्यांनी केला. ओवैसींचे भाजपासोबत संगनमत आहे असा आरोपही किदवाई यांनी केला.

– भाजपाला राजकीय फायदा?
उत्तर प्रदेशात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यांना ओवैसी आणि आझाद यांच्या युतीत राजकीय फायदा दिसत आहे. या आघाडीमुळे मुस्लिम मतांमध्ये फूट पडली आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपापासून दूर जाऊन समाजवादी पार्टी-काँग्रेसकडे वळलेली बिगर-जाटव दलित मते आझाद यांच्या बाजूने गेली, तर विरोधकांची ताकद कमी होऊ शकते, असे भाजपच्या एका नेत्याने म्हटले आहे.

याशिवाय, ओवैसी सातत्याने समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना मुस्लिमांच्या प्रश्नांवरून वारंवार लक्ष्य करत आहेत. त्यामुळे मुस्लिम मतदारांमध्येही समाजवादी पार्टीचा पाठिंबा कमी होऊ शकतो, असा या भाजपा नेत्याचा दावा आहे.