काय आहे प्रकरण? शिंदे शिवसेनेचे 22 जागांवरून फाटणार

काय आहे प्रकरण? शिंदे शिवसेनेचे 22 जागांवरून फाटणार

भाजपा सेनेत ठिणगी पडण्याची श्यकता

प्रतिनिधी
मुंबई : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तविली जात आहेत, अशातच आता भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीमध्ये याच मुद्द्यावरुन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्याचे कारण असे आहे की, एकनाथ शिंदे यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने 2019 मध्ये लढवलेल्या 23 पैकी 22 जागांवर दावा सांगितला जाऊ शकतो. यावर पक्ष विस्तारासाठी सातत्याने आक्रमक भूमीकेत असलेला भाजप पक्ष काय भूमिका घेणार, हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत त्यांनी म्हटले की, लोकसभेच्या 22 जागा लढवण्यासंदर्भात चर्चा केली आहे. यापैकी 13 खासदार हे सध्या शिवसेनेसोबत (शिंदे गट) आहेत. तर उर्वरित खासदार ठाकरे गटासोबत असून या जागांचा आढावा घेतला जाईल. यानंतर त्याठिकामी उमेदवार उतरवण्याच्या दृष्टीने तयारी केली जाईल. लोकसभेच्या या 22 जागांवर आमचा नैसर्गिकपणे हक्क असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या नेत्यांनी केले.

खासदारांसोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी 13 विद्यमान खासदारांसोबत चर्चा केली. या जागा पुन्हा जिंकण्यासाठी काय करावे लागेल, यावर चर्चा झाली. लोकसभेच्या या 13 जागांसंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी संबंधित मतदारसंघांमधील भाजप आणि शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांची बैठक होतील, असेही सांगण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या सर्व लोकसभा मतदारसंघातील विकासकामांना गती देण्याचा निर्णय झाला. अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली.

–12 खासदारांनी दिला शिंदेंना पाठिंबा
जुलै महिन्यात शिवसेनेच्या 19 खासदारांपैकी 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट असल्याचे पत्रही दिले होते. यानंतरच्या काळात वायव्य लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिंदे गटातील खासदारांची संख्या 13 वर गेली होती. आता उद्धव ठाकरे गटाकडे केवळ सहा खासदार उरले आहेत.