अजितदादांचा भाजपा प्रवेश: हा आमदार म्हणतो मग पक्षात राहिले काय?

अजितदादांचा भाजपा प्रवेश: हा आमदार म्हणतो मग पक्षात राहिले काय?

-आमदार माणिकराव कोकाटे यांचे भाष्य

प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर आपले मत व्यक्त केले आहे. माणिकराव कोकाटे म्हणाले की, अजित पवार जर राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले तर पक्षात काहीच शिल्लक राहणार नाही. अजित पवार सोडले तर आमदारांनी विश्वास ठेवावा असा कोणता नेता सक्षम नाही. पण संभाव्य वक्तव्य करणे मला योग्य वाटत नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोंडी होते असे म्हणता येणार नाही. पक्षाचे सर्व निर्णय तेच घेतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे म्हणाले की, उगाच अंदाज व्यक्त करत नाही, मी अंदाजावर भाकीत करत नाही. जशी परिस्थिती निर्माण होईल तसे निर्णय घेण्यात येतील. जो निर्णय होईल त्याला आम्ही बांधील आहोत. सरकार पडणार नाही हे सत्यच आहे, 16 आमदार अपात्र ठरल्याने सरकार पडणार नाही, असे कोकाटे यांनी म्हटले आहे.

–महाराष्ट्रातून भाजपला 10 ते 15 जागा

माणिकराव कोकाटे म्हणाले की, महाराष्ट्रातून भाजपला 10 ते 15 लोकसभेच्या जागांवर जागा मिळू शकत नाही. मोठ्या प्रमाणात जागा या विरोधकांना मिळणार आहे. हे भाजपला परवडणारे नाही, म्हणून भाजप वेगळा विचार करु शकतो, चाचपणी करू शकतो, वेगळे पर्याय पडताळू शकतो. हे सर्व साध्य करण्यासाठी त्यांच्याकडे सर्व यंत्रणा आहेतच असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

–उद्धव ठाकरेंना सर्वत्र सहानुभूती

माणिकराव कोकाटे म्हणाले की, ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली आवक आहे. उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहेच, त्यांच्या पक्षाची शहरी भागात चांगली पकड आहे. पण त्यांना शहरी भागात शिंदे सेनेमुळे विभाजन आहे. तसे राष्ट्रवादीला कुठेही नाही म्हणून भाजपकडूनपर्याय तपासले जात असतील.

विरोधी पक्षनेते अजित पवार हे जी भूमिका घेतील तीच भूमिका माझी असेल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी म्हटले आहे. मी हे आधी देखील सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्या आधि पुढील काळात अजित पवार यांच्यासोबत राहणार.

एकीकडे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबद्दलच्या बातम्यांमुळे राजकीय वातावरण सध्या तापले आहे. यातच अण्णा बनसोड यांनी केलेले वक्तव्य आणि काही दिवसांपूर्वीची त्यांची फेसबूक पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे बारामतीत असताना मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांसोबतच्या बैठकीचा हवाला देऊन पवारांच्या कुटुंबावर दबाव असल्याचे म्हटले होते.