शिंदे सरकारमधील हा मंत्री म्हणतो सरकार कुणाचे ‘सत्ता’ आपली पक्की

शिंदे सरकारमधील हा मंत्री म्हणतो सरकार कुणाचे ‘सत्ता’ आपली पक्की

-त्यांच्या विधानाची राज्यभर चर्चा

प्रतिनिधी
मुंबई : इतक्या वर्षांपासून सत्तेत आहे. नाव सत्तार आहे. कोणाचीही सत्ता आली की आपण पक्के, असे वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. आपल्या वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन अब्दुल सत्तार नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांच्या या विधानाचीही मोठी चर्चा होत आहे.

राज्याचे कृषी मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे काल हिंगोली जिल्हाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतींची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या मेळाव्यात त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विधानसभेतही शेतकऱ्यांचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर गाजला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. अब्दुल सत्तार यांनी नुकसानीची पाहणी करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी रात्रीच्या वेळी पाहणी केल्याने त्यांच्यावर टीका झाली होती.

आता आपल्या नावात सत्तार आहे. आणि आपण नेहमी सत्तेत असतो, या विधानाने पुन्हा एकदा सत्तार चर्चेत आले आहेत. हिंगोलीत अब्दुल सत्तारांनी अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाची काल पाहणी केली. शेतकऱ्यांना पुढील 15 दिवसात नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन सत्तार यांनी दिले आहे.
अब्दुल सत्तार म्हणाले, मी तुमच्या सारखाच एक सामान्य कुटुंबातून आलो आहे. बस माझी बॅटरी चार्ज केली आणि मी इथपर्यंत आलो. भाऊ आले (हेमंत पाटील ) इतक्या वर्षापासून आपण सत्तेत आहोत. शेवटी नावात सत्तार आहे. त्यामुळे कोणाचीही सत्ता आली की आपण पक्के असे सत्तार म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.