12 डिसेंबरला फैसला: धनुष्यबाण ठाकरे की शिंदे गटाचा
– वाद केंद्रीय निवडणूक आयोगात
प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष कायदेशीररित्या एकीकडे सुप्रीम कोर्टात चालू असताना राज्यातही टीकेच्या ठिणग्या उडत आहेत. ठाकरेंच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगात धनुष्यबाण ठाकरे गटाचा की, शिंदे गटाचा यावर येत्या 12 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
-काय आहे शिंदे गटाचा दावा?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार आणि खासदार फोडल्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात उघड-उघड दोन गट पडले. त्यानंतर शिंदे गटाने आम्हीच शिवसेना पक्ष असल्याचा दावा केला याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरही दावा केलेला आहे. आता हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात असून त्यावर 12 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
-9 डिसेंबरपर्यंत कागदपत्रे जमा करा
शिंदे गट आणि ठाकरे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने 9 डिसेंबरपर्यंत संबंधित कागदपत्रे आयोगात जमा करावे, असे निर्देश दिले आहेत. तर 12 डिसेंबरला या प्रकरणी सुनावणी होणार असल्याचेही एनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी ठाकरे गटाची होती. परंतु सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने ही मागणी फेटाळत निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाबाबत सुनावणी घेण्यास सांगितले होते.
-ऑक्टोबरमध्ये आयोगाने चिन्ह गोठवले
ऑक्टोबर 2022 मध्ये निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. त्यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने या दोन्ही गटांना दोन वेगवेगळी नावे आणि चिन्हे दिली होती. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानुसार, उद्धव ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह तर शिंदे गटाला ढाल – तलावर हे चिन्ह देण्यात आले होते.
-नेमका धनुष्यबाण कुणाकडे?
धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगच निर्णय घेणार असून पहिली सुनावणी पार पडणार आहे. याबाबत राज्यातही मोठी उत्सुकता लागून आहे.


