या नेत्याचे ‘हर हर महादेव’ जेल की बाहेर
-थोड्याच वेळात जामिनावर सुनावणी
प्रतिनिधी
ठाणे : चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण करत ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक केली होती. थोड्याच वेळात त्यांच्या जामिनावर सुनावणी होईल.
पोलिस आव्हाड यांना घेऊन ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले आहेत. थोड्याच वेळात जामिनावर सुनावणी होईल. त्यामुळे न्यायालय आव्हाड यांना जामीन देते की आव्हाडांना आजचा दिवस कोठडीत घालावा लागतो, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे. न्यायालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. न्यायालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात जमले आहेत.
-12 जणांवर गुन्हे दाखल
जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांना ठाणे पोलिसांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आणले आहे. या सर्वांविरोधात कलम 323 आणि कलम 504 लावण्यात आले आहे. आव्हाडांसह कार्यकर्त्यांच्या जामिनावरही आजच निर्णय होणार आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना आज जामीन न मिळाल्यास ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
– नेमके प्रकरण काय?
7 नोव्हेंबर रोजी रात्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्ते ठाण्यातील विवियन मॉल येथे शिरले. यावेळी त्यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेच त्यांना विरोध करणाऱ्या काही जणांना बेदम मारहाण केली. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले. दुसऱ्या दिवशी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मोफत शोचे आयोजन केले. त्यानंतर राजकीय स्तरावर हा वाद वाढतच गेला. हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
-या दृश्यांवर आक्षेप
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभूंची लढाई दाखवली. त्यांचे नाते गेली साडेतीनशे वर्षे महाराष्ट्राला माहीत आहे, मग विकृती दाखवली जात आहे? असे आक्षेप आव्हाडांनी नोंदवले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मांडीवर घेऊन कोथळा काढला.
रामाला हनुमान तसा शिवाजी महाराजांना बाजीप्रभू असे चित्रपटात दाखवले.
-कुठल्याही स्थितीत माफी नाही
जितेंद्र आव्हाड म्हणाले, आमची इच्छा आहे की, महाराष्ट्रात विकृती जाऊ नये. बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांविरोधात लढले हे चित्रपटात दाखवले हे चूक आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करण्याचे काम सुरू असून विकृत इतिहास दाखवला जात आहे. मला फाशीवर दिले तरी माफी मागणार नाही.
-दोन वर्षांपूर्वी अधिक चर्चेत
दोन वर्षांपूर्वी आव्हाडांविरोधात पोस्ट टाकल्याचा आरोप करत संगणक अभियंता अनंता करमुसे यांना घरातून नेऊन आव्हाड यांच्या बंगल्यात मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीच्या वेळी आव्हाड उपस्थित असल्याचे करमुसे यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते. आव्हाड यांनाही अटक होऊन त्यांची सुटका झाली होती.


